
KDMC News : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार सोहळा; कल्याण-डोंबिवली महापालिकेपूर्वी राजकीय समीकरणे बदलली
कल्याण/डोंबिवली | येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले असतानाच, कल्याण-डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा हादरा बसला आहे. माजी आमदार आणि ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते सुभाष भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. आज, 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
ठाकरेंचे विश्वासू सहकारी आता भाजपमध्ये सुभाष भोईर हे कल्याण ग्रामीण मतदारसंघातील एक प्रभावी नाव आहे. 2014 मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. पक्षाच्या पडत्या काळातही त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती, मात्र आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
डोंबिवलीत भाजपचे वर्चस्व वाढले
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता सुभाष भोईर यांच्या रूपाने आणखी एक मोठा चेहरा भाजपकडे वळल्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपची ताकद दुपटीने वाढली आहे. यामुळे केवळ ठाकरे गटालाच नाही, तर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही आगामी काळात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.



