मुंबई
Trending

MLA Prashant Thakur : तक्का येथील फुटपाथवर आढळले बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक

MLA Prashant Thakur : नवजात मुलीच्या भवितव्याच्या अनुषंगाने योग्य ती पावले उचलणार – आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल शहरातील तक्का परिसरात आज सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. मुलींच्या बालगृहाबाहेर फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले, त्यासोबत इंग्रजी भाषेत एक चिठ्ठी सापडली असून बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचे या चिठ्ठीतून पालकांनी म्हटले आहे. तर या मुलीच्या भवितव्याच्या अनुषंगाने योग्य ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे.

आज सकाळी तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. येथील नागरिकांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, त्यांना बास्केटमध्ये एक नवजात बाळ दिसले. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या चिठ्ठीतून बाळाच्या पालकांची बिकट मानसिक आणि आर्थिक परिस्थिती समोर आली आहे. मात्र, अशा प्रकारे बाळाला सोडून देणे हा गंभीर गुन्हा असल्याने, पनवेल शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बास्केटमध्ये बाळासोबत एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यामुळे या घटनेला एक भावनिक वळण मिळाले आहे. या चिठ्ठीत लिहिले आहे की…..

“प्रिय सर/मॅडम, आम्हाला हे करावे लागले यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही. कृपया या प्रकरणात कोणालाही गुंतवू नका किंवा प्रकरण वाढवू नका. आम्हाला जे काही सहन करावे लागत आहे, ते या बाळाच्या नशिबी येऊ नये अशी आमची इच्छा आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की तिची काळजी घ्या. आशा आहे की एक दिवस आम्ही तिला परत घेऊ.” कारण आम्ही तिच्या जवळच आहोत. आम्ही दिलगीर आहोत.”

कोट-

सर्व देशवासीयांच्या दृष्टिकोनातून अतिशय चिंताजनक आणि हृदयद्रावक अशी हि घटना आहे. बाळ अशा पद्धतीने सोडून दिले जाणे विशेषत्वाने ते बाळ एक मुलगी आहे असे समजते त्या वेळेला आपल्या सर्वांची आणखी चिंता वाढवणारी हि घटना आहे. नवजात बाळाचा त्याग करावा असे बाळाच्या आईवडिलांना का वाटावा?. काय त्यांची मनोवृत्ती आहे हे कळायला मार्ग नाही. नेमके कारण काय आहे हे कळत नाही. हे बाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस तपासात कारण निष्पन्न होईलच. आरोग्याच्या दृष्टीने बाळाची रुग्णालयात तपासणी झाली पुढे अलिबाग येथे तपासणी होणार आहे. जर तब्येतेची कारण आहे किंवा काहीही इतर कारण असले तरी अशा बाबतीत समाज मदत करत राहतो. आता जोपर्यत बाळाच्या आई वडिलांचा शोध लागत नाही तोपर्यंत आणि आवश्यकता आहे तो पर्यंत समाज निश्चित पुढे येऊ शकतो. या बाळाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून व्यक्तिशः मी आणि आमचे सर्व सहकारी जी काही आर्थिक बाजू उचलायची आहे ती आम्ही नक्कीच उचलू. तसेच या संदर्भामध्ये मी पोलिसांशी समन्वय करणार असून या बाळाचा सांभाळ, उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आमच्याकडून करता येईल ते मी करेन. या मुलीच्या भवितव्याच्या अनुषंगाने योग्य ती पावले उचलली जातील. – आमदार प्रशांत ठाकूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0