मुंबई
Trending

Sanjay Raut : “ठाकरे एकत्र?” – राज-उद्धव युतीच्या चर्चांना वेग; संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया

Sanjay Raut : ‘युतीच्या प्रक्रियेला सुरुवात झालीय’ – राऊतांचा दावा

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ नव्हे तर ‘ठाकरे आणि ठाकरे’ अशी समीकरणं घडण्याची शक्यता चर्चेत आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांना उधाण आलं असून, स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते पक्षनेत्यांपर्यंत सकारात्मक सूर उमटत आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना या संभाव्य युतीवर भाष्य केलं. “नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू झालं आहे. सहकारी याबाबतीत खूप सकारात्मक आहेत आणि त्यामुळेच जमिनीवरही त्याचे प्रतिबिंब दिसतं,” असं राऊतांनी स्पष्ट केलं.

या वक्तव्यानंतर राज्यात मनसे-शिवसेना युतीचे वारे अधिकच जोरात वाहू लागले आहेत. दोन्ही नेत्यांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत, हे आधीच अमित व आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं होतं. त्यामुळे प्रत्यक्ष चर्चा झाल्याचा अंदाजही लावला जातोय.

दरम्यान, याच संवादात राऊतांनी केंद्र सरकारवर आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. “घराघरात सिंदूर वाटायला निघालात, पण पराक्रम लष्कराने केलाय. तुम्ही राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करता. ट्रम्पच्या दबावाखाली युद्धविराम केला, संसदेला विचारलं का?” असा रोखठोक सवाल त्यांनी केला.

त्यांनी पुढे म्हटलं की, “पीओके दोन दिवसांत ताब्यात येईल असं परराष्ट्र मंत्री म्हणत होते. मात्र, अमेरिकेच्या दबावाखाली आपण मागे फिरलो. भारत कधी कोणासमोर झुकला नाही, पण तुमचं नेतृत्व झुकलं, ते शरणागतीच म्हणावी लागेल.”

एकीकडे भावनिक राजकीय समीकरणं बदलत असल्याचं सूचित केलं जातंय, तर दुसरीकडे मोदी सरकारवर जोरदार आक्रमण करत राऊतांनी आगामी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असल्याचं स्पष्ट संकेत दिलेत. राज-उद्धव युतीचं चित्र काही दिवसांत स्पष्ट होईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0