क्रीडा

U-19 World Cup : भारत पुन्हा ‘विश्वविजेता’! अंडर-19 वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडचा 100 धावांनी पराभव; सहाव्यांदा कोरले जेतेपदावर नाव

•वैभव सूर्यवंशीची 175 धावांची वादळी खेळी; 411 धावांचा डोंगर उभारून भारताने रचला इतिहास

U-19 World Cup win Ind | झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबवर आज भारतीय युवा संघाने नवा इतिहास रचला आहे. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत ‘विश्वविजेते’ होण्याचा मान पटकावला. सलामीवीर वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने सहाव्यांदा हे जेतेपद पटकावले आहे.

वैभव-आयुषची ‘विराट’ भागीदारी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अडखळती झाली होती. आरोन जॉर्ज (9) लवकर बाद झाला. मात्र, त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले.

वैभव सूर्यवंशी: अवघ्या 80 चेंडूत 175 धावा (15 चौकार, 15 षटकार). वैभवने 55 चेंडूत शतक पूर्ण केले, जे स्पर्धेच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले.

आयुष म्हात्रे: 51 चेंडूत 53 धावांची संयमी खेळी करत वैभवला मोलाची साथ दिली.

अंतिम धावसंख्या: शेवटी अभिज्ञान कुंडू (40) आणि कनिष्क चौहान (37*) यांच्या छोटेखानी खेळींमुळे भारताने 9 बाद 411 धावांचा डोंगर उभा केला.

इंग्लंडचा प्रतिकार ठरला अपुरा

412 धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीलाच धक्का बसला. जोसेफ मुरेस 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर बेन डॉकिन्स (66) आणि बेन मेयस (45) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात ते अडकले. कॅलेब मॅथ्यू फाल्कनरने अखेरपर्यंत झुंज दिली, पण विकेट्स पडत गेल्याने इंग्लंडचा डाव 311 धावांत आटोपला.

वैभव सूर्यवंशीचे विश्वविक्रम

1.एका डावात सर्वाधिक षटकार: अंतिम सामन्यात 15 षटकार मारून वैभवने नवा जागतिक विक्रम रचला.

2.सर्वात वेगवान शतक: 55 चेंडूंत शतक झळकावून तो स्पर्धेतील सर्वात वेगवान शतकवीरांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला.

3.स्पर्धेतील कामगिरी: या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव दुसऱ्या स्थानी राहिला.

भारताचे अंडर-19 विश्वविजेतेपद

2000: मोहम्मद कैफ (कर्णधार)
2008: विराट कोहली (कर्णधार)
2012: उन्मुक्त चंद (कर्णधार)
2018: पृथ्वी शॉ (कर्णधार)
2022: यश धुल (कर्णधार)
2026: आयुष म्हात्रे (कर्णधार)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0