
Mumbai Thackeray Brothers Latest News : वरळीत आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात सावध खेळी; शिवडीत मनसेच्या मागणीमुळे पेच, तर दादरमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची बंडखोरी
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी Mumbai BMC Election अर्ज भरण्याचा आज (मंगळवार) शेवटचा दिवस असताना, ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) आणि मनसेने आपल्या उमेदवारांची निवड करताना कमालीची गुप्तता पाळली आहे. विशेषतः वरळी, शिवडी आणि दादर या हक्काच्या मतदारसंघांत अंतर्गत बंडाळी थोपवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी शेवटच्या क्षणी ‘एबी फॉर्म’ (AB Form) वाटपाची रणनीती अवलंबली.
किशोरी पेडणेकर यांची प्रतीक्षा संपली
वरळी विधानसभा हा आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असल्याने येथे उमेदवारी देताना ‘मातोश्री’ने अत्यंत सावधगिरी बाळगली. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रभाग क्रमांक 199 मधून उमेदवारी मिळवण्यासाठी सोमवारी संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. याच प्रभागात शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये आग्रही होते, मात्र त्यांच्या पत्नी अबोली खाड्ये यांना वॉर्ड 198 मधून संधी देऊन पक्षाने हा वाद मिटवला. मात्र, वॉर्ड 193 मध्ये हेमांगी वरळीकर यांच्या नावाची चर्चा सुरू होताच शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिल्याने वरळीत काही प्रमाणात नाराजी कायम आहे.
दादरमध्ये ‘मनसे’चा शिरकाव; शिवसैनिक संतप्त
दादरमधील प्रभाग क्रमांक 192 मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिल्याने शिवसेना ठाकरे गटातील इच्छुकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव यांनी या निर्णयामुळे राजीनामा दिला असून, ठाकरे गटातील अनेक पदाधिकारीही या निर्णयावर नाराज आहेत. दादर हा शिवसेनेचा जन्म झाला असलेला भाग असल्याने येथे मनसेला जागा सोडणे शिवसैनिकांच्या जिव्हारी लागले आहे.
शिवडीत ‘मनसे’च्या दोन जागांचा हट्ट?
शिवडी विधानसभा मतदारसंघातही युतीचा तिढा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. प्रभाग क्रमांक 206 मधून शिवसेनेने (ठाकरे) सचिन पडवळ यांना अधिकृतपणे मैदानात उतरवले आहे. मात्र, शिवडीतील इतर दोन प्रभागांसाठी मनसेने आग्रही मागणी केल्यामुळे येथे जागावाटपाचा पेच निर्माण झाला होता. युती टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या भागातील नाराजांना थोपवण्याचे मोठे आव्हान पेलले आहे.
ठाकरे बंधूंची ‘मराठी कार्ड’ रणनीती
उद्धव आणि राज ठाकरे यांनी 21 वर्षांनंतर एकत्र येत ‘मराठी अस्मिता’ आणि ‘मराठी माणूस’ या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळेच गिरगाव, दादर, वरळी आणि परळ यांसारख्या मराठीबहुल भागात दोन्ही पक्षांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून तगडे उमेदवार देण्यावर भर दिला आहे.



