मुंबईत महापालिका निवडणुकीपूर्वी ‘बॅनर वॉर’! – ‘जे हिंदुत्वाचे नाही झाले, ते मराठी माणसाचे काय होणार?’ बॅनरने उडवली खळबळ

•बीएमसी निवडणुकीच्या घोषणेनंतर थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य; ‘BMC IS NOT A FAMILY BUSINESS’ असा स्पष्ट संदेश; बॅनर कुणी लावले, याचा उल्लेख नसल्याने रहस्य कायम
मुंबई :- राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून मुंबईच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज, युती आणि प्रचाराच्या तयारीला सुरुवात झाली असतानाच, मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या एका बॅनरने सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.या बॅनरबाजीमधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
बॅनरवरील आक्षेपार्ह संदेश
मुंबईत अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या या बॅनरवर पुढीलप्रमाणे थेट संदेश देण्यात आला आहे:
“जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार, मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको…” “BMC IS NOT A FAMILY BUSINESS”
या संदेशातून स्पष्टपणे उद्धव ठाकरे आणि ‘ठाकरे कुटुंबा’च्या नेतृत्वावर टीका करण्यात आली आहे, तसेच मुंबई महानगरपालिकेला ‘कौटुंबिक व्यवसाय’ न बनवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बॅनरबाजीचे रहस्य
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला करणारी ही बॅनरबाजी कोणी केली आहे, याचा उल्लेख बॅनरवर नाही. त्यामुळे हे बॅनर कोणत्या पक्षाने किंवा गटाने लावले आहेत, याबद्दल मुंबईत जोरदार चर्चा सुरू आहे.
महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर झालेल्या या बॅनर वॉरमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीत हाच मुद्दा विरोधकांच्या प्रचाराचे प्रमुख हत्यार ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


