Uddhav Thackeray : मातोश्रीवर राजकीय खलबतं! विजय वडेट्टीवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईसह चंद्रपूर महापौरपदाच्या पेचात नवी समीकरणं?

Vijay Wadettiwar Meet Uddhav Thackeray : मुंबईत ‘महायुती’त ठिणगी तर चंद्रपुरात ‘महाविकास आघाडी’ची जुळवाजुळव; वडेट्टीवारांच्या ‘मातोश्री’ वारीने राजकीय वारे फिरले
मुंबई l राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता महापौर निवडीसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मुंबईत भाजप आणि शिंदे गटात महापौरपदावरून ‘हायव्होल्टेज’ ड्रामा सुरू असतानाच, आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे केवळ मुंबईच नाही, तर चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेचा पेचही सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चंद्रपूरचा ‘किंगमेकर’ ठरणार ठाकरे गट?
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, मात्र बहुमतासाठी आवश्यक आकडा अद्याप दूर आहे. दुसरीकडे, भाजपने 23 जागा जिंकून काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अशा स्थितीत शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहेत. भाजपने ठाकरे गटाला महापौरपदाची ऑफर दिल्याची चर्चा असतानाच, वडेट्टीवारांनी थेट ‘मातोश्री’ गाठल्याने चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर बसवण्यासाठी ठाकरे गटाची मदत घेण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
मुंबई आणि चंद्रपूरचा ‘कॉम्बो’ फॉर्म्युला?
राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, मुंबई आणि चंद्रपूर या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीची ताकद टिकवून ठेवण्यासाठी या भेटीत खलबतं झाली. मुंबईत भाजपला रोखण्यासाठी ठाकरे गटाला काँग्रेसची साथ हवी आहे, तर चंद्रपुरात सत्तेसाठी काँग्रेसला ठाकरे गटाच्या नगरसेवकांची गरज आहे. या ‘देण्या-घेण्याच्या’ गणितातूनच वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी रणनीतीवर चर्चा केल्याचे समजते.
अंतर्गत कलह विसरून वडेट्टीवारांची मोर्चेबांधणी चंद्रपुरात काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात महापौरपदाच्या नावावरून काही प्रमाणात मतभेद होते. मात्र, भाजपने नगरसेवकांची पळवापळवी सुरू केल्याचा आरोप करत वडेट्टीवारांनी आता पक्षीय हित जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. “चंद्रपूरचा महापौर हा काँग्रेसचाच होईल आणि त्यासाठी महाविकास आघाडीचे मित्रपक्ष आमच्यासोबत राहतील,” असा विश्वास वडेट्टीवारांनी या भेटीनंतर व्यक्त केला आहे.


