Thane Police Mission All Out : गणेशोत्सवापूर्वी ठाण्यात ‘ऑपरेशन ऑल आऊट’; 250 पोलिसांची धडक कारवाई, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

Thane Police mission All Out Latest News :46 अधिकारी आणि 205 कर्मचारी सहभागी; 86 हजार रुपयांचा दंड वसूल
उल्हासनगर :- गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणासुदीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलिसांकडून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. परिमंडळ चारच्या पोलिसांनी शनिवारी रात्री अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही शहरांमध्ये ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. Thane Police Latest News
परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली, ज्यात तब्बल 250 पोलिसांचे पथक सहभागी झाले होते. यात 46 पोलिस अधिकारी आणि 205 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या मोहिमेत पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या कारवाया केल्या:
- दारूबंदी कायद्यांतर्गत 9 गुन्हे दाखल करण्यात आले.
- अमली पदार्थांबाबत 10 गुन्हे दाखल झाले.
- हद्दपारी केलेल्या 6 आरोपींपैकी 4 जणांना अटक करण्यात आली.
- 153 सराईत गुन्हेगारांची कसून चौकशी करण्यात आली.
- आर्म्स ऍक्ट अंतर्गत 3 आरोपींना अटक करण्यात आली, तर एकाला नोटीस देण्यात आली.
- 14 ठिकाणी नाकाबंदी करून 296 वाहनांची तपासणी करण्यात आली आणि नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून 86 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, “गणेशोत्सव आणि इतर सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी पोलिसांचे हे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.” गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस 24 तास सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.


