Kalyan Khadakpada Police : कल्याणमध्ये खडकपाडा पोलिसांकडून 25 नागरिकांचे चोरीस गेलेले मोबाईल परत

Kalyan Khadakpada Police Latest News : साडेतीन लाखांहून अधिक किंमतीचे मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
कल्याण :- कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या Kalyan Khadakpada Police Station हद्दीतून गेल्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत चोरीला गेलेल्या 25 नागरिकांचे मोबाईल पोलिसांनी शोधून काढले आहेत. सुमारे साडेतीन लाख रुपयांहून अधिक किमतीचे हे सर्व मोबाईल पोलिसांनी गुन्हे अहवाल तांत्रिक संकेतस्थळाच्या माध्यमातून शोधून मूळ मालकांना परत केले आहेत. Kalyan Mobile Robbery Latest News
चोरट्यांनी सामान्य नागरिकांना केले होते लक्ष्य
खडकपाडा पोलीस ठाणे हद्द ही मध्यमवर्गीय वस्तीचा भाग असल्याने, येथे सकाळी-संध्याकाळी फिरणाऱ्या नागरिकांना तसेच नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्यांना चोरट्यांनी लक्ष्य केले होते. हातामधील किंवा पिशवीमधील मोबाईल हिसकावून चोरट्यांनी पलायन केल्याच्या सुमारे 25 तक्रारी खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांच्या मोबाईल चोरीच्या घटनाही होत्या.
विशेष पथकाची कामगिरी
मोबाईल चोरीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांना विशेष शोध पथक तयार करण्याचे निर्देश दिले होते. साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वाघमोडे यांनी गुन्हे शोध पथकाचे एक विशेष युनिट तयार केले.
या पथकाने गेल्या दोन महिन्यांत चोरीला गेलेल्या, हरविलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईलचा कसून शोध घेतला. पोलिसांजवळील गुन्हे शोध अहवाल तांत्रिक यंत्रणेच्या साहाय्याने हे मोबाईल शोधण्यात आले. काही मोबाईल चोरट्यांनी कल्याण, डोंबिवली आणि ठाणे परिसरातील व्यापारी व नागरिकांना कमी किमतीला विकले असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी हे सर्व मोबाईल एकेक करून ताब्यात घेतले.
जाहिर कार्यक्रमात मोबाईल परत
मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईलची ओळख पटवून बुधवारी उपायुक्त झेंडे यांच्या सूचनेनुसार सर्व 25 मोबाईल धारकांना खडकपाडा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात या मोबाईलचे वाटप करण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांप्रति समाधान व्यक्त केले.


