Vasai Crime News : स्कूटी चोरून ती ‘ग्राइंडर’ने कापणारा सराईत चोरटा पेल्हार पोलिसांच्या जाळ्यात

•21 गुन्ह्यांची नोंद असलेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या
वसई :- एका शिक्षिकेची स्कूटी चोरून तिचे तुकडे करून भंगारात विकणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपी प्रदीप सोमनाथ बॅनर्जी याच्या अटकेमुळे वसई आणि मुंबईतील महत्त्वाचे चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्या भंगार चोरालाही ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
वसई पूर्वेतील तुंगार फाटा येथील मंगलमूर्ती अपार्टमेंटमधून पूजा डामोर या शिक्षिकेची होन्डा डियो स्कूटी (MH 48 AP 7884) 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान चोरीला गेली होती. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला.
ग्राइंडरने कापून विकले गाडीचे भाग
तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी प्रदीप बॅनर्जी याला वाघरेलपाडा येथून ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत असताना त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याने चोरलेली गाडी ओळखून येऊ नये यासाठी ग्राइंडर मशीनने कापून तिचे तुकडे केले आणि वालीव येथील भंगार दुकानदार जोखू हनुमान गौतम याला विकले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भंगारवाल्याला ताब्यात घेतले असून गाडीचे पार्ट हस्तगत केले आहेत.
कांदिवलीतील चोरीचाही छडा
आरोपी प्रदीप बॅनर्जी याने गुन्हा करण्यासाठी वापरलेली ॲक्टिव्हा स्कूटी (MH 04 GT 0381) कुठून आणली, याचा तपास केला असता ती कांदिवली पूर्व (समतानगर पोलीस ठाणे) येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या अटकेमुळे दोन महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सराईत गुन्हेगाराचा इतिहास
अटक करण्यात आलेला 46 वर्षीय प्रदीप बॅनर्जी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत 21 गुन्हे दाखल आहेत.
ही यशस्वी कामगिरी पोलीस उप-आयुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.



