
Eknath Shinde On Blood Donation : वंदनीय दिघे साहेबांची परंपरा कायम; नववर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला ‘ग्रीनफिल्ड महामार्गा’ची भेट
ठाणे | सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुण पिढी जिथे जल्लोषात मग्न असते, तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाच्या 61 व्या वर्षीही सामाजिक बांधिलकी जपत मध्यरात्री रक्तदान केले. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेली ‘मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर’ ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू असल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले.


सामाजिक बांधिलकीचा वारसा
एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले की, आनंद दिघे साहेबांनी 30 वर्षांपूर्वी तरुणांना व्यसनाऐवजी समाजसेवेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला होता. तोच वारसा आज शिवसेना पुढे घेऊन जात आहे. याप्रसंगी वर्षानुवर्षे रक्तदान करणाऱ्या दात्यांचा आणि सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
देशाच्या अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक झेप
नव्या वर्षात पाऊल ठेवताना एकनाथ शिंदे यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला आहे.
पंतप्रधानांचे आभार ही 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे.
महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट: नाशिक-अक्कलकोट महामार्ग
महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नाशिक ते अक्कलकोट या सहापदरी ग्रीनफिल्ड महामार्गाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प राज्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 374 किमी लांबीचा हा मार्ग सुमारे 19,142 कोटी रुपयांचा असून यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष (2026) असल्याने शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षातर्फे वर्षभर विशेष आरोग्य उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण” या मंत्रानुसार तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे हेच या वर्षाचे ध्येय असेल.


