Panvel Crime News : पीएसआयकडून महिला पोलिसावर अत्याचार

पनवेल जितिन शेट्टी : पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने पनवेलमध्ये राहणाऱ्या महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या पोलीस उपनिरीक्षकाने पिडीत महिला पोलिसाचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मागील ५ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच तिचा जातीवाचक अपशब्द वापवरुन अपमान केल्याचा आरोप महिला पोलिसाने केला आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षकाविरुध्द बलात्करासह अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षकाच्या आईलाही सहआरोपी करण्यात आले आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला पोलीस उपनिरीक्षक सध्या वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असून २०२० मध्ये तो तळोजा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्याची पिडीत महिला पोलिसाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर मार्च २०२० मध्ये पोलीस उपनिरीक्षकाने चहा पिण्याच्या बहाण्याने पिडीतेला पनवेल मधील नेरे,महालक्ष्मीनगर येथील आपल्या भावाच्या खोलीवर नेले. तेथे त्याने चहामध्ये गुंगीकारक औषध मिसळून तिला बेशुध्द केले. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे, तर या घटनेवेळी तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला गप्प बसवले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवत एप्रिल २०२० ते एप्रिल २०२५ दरम्यान पनवेल येथील घरात आणि खांदा कॉलनीतील खांदेश लॉजमध्ये वारंवार लैंगिक अत्याचार केले. याच कालावधीत आरोपीने चारचाकी वाहन घेण्यासाठी पिडीतेकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तिचे आक्षेपार्ह फोटो मुलाला दाखवण्याची धमकी देऊन तिच्याकडून २ लाख रुपये ऑनलाईन आणि ३ लाख रुपये रोख स्वरुपात उकळले.
दरम्यान, आरोपीचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाल्यानंतर पिडीतेने लग्नाची मागणी केली असता, या पोलीस उपनिरीक्षकाने तिच्या मुलाच्या वयाचा संदर्भ देत तिला जातीवाचक अपशब्द वापरुन अपमानित केले. त्यामुळे पिडीतेने याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षकाच्या आईला दिली असता, तिने देखील तिला जातीवरुन शिवीगाळ केली आणि तिचा अपमान केला. या संपूर्ण प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पिडीत महिलेने पनवेल तालुका पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्या आईविरुध्द बलात्कार, धमकी, फसवणूक आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.


