Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : “ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल नाही?”- धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांना थेट आव्हान!

Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : ‘जमीन चोरांचा सहभाग असलेली आणखी 2 प्रकरणे घेऊन येणार’ – धंगेकरांचा इशारा; मोहोळांनी महापौर असताना बिल्डरची गाडी वापरल्याचा गंभीर आरोप
पुणे :- पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या कथित गैरव्यवहारावरून शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण चांगलेच तापले आहे. Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol मोहोळ यांच्यावर दररोज नवनवीन आरोप करणारे धंगेकर यांनी आज (शुक्रवार) पुन्हा एकदा त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रातून केला ॲट्रॉसिटीचा दावा
रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या ‘X’ (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करत मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची (Election Affidavit) प्रत जोडली आहे. धंगेकरांनी आरोप केला की, “अतिशय सुसंस्कृत व सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ काल माध्यमांशी बोलताना त्यांच्यावर एकही गुन्हा नाही, असं खोटं बोलले.”
धंगेकर म्हणाले, “मी या ट्विटसोबत त्यांच्या इलेक्शन एफिडेविटमधील पानांची कॉपी जोडतोय. त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते कशाकशा संदर्भात आहेत, अगदी ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल आहे.”
धंगेकर यांनी मोहोळ यांना फटकारले की, “फक्त बदनामी करण्यासाठी माझ्यावर 13 केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही, असं बोलून तुम्ही प्रेसची आणि तमाम पुणेकरांची फसवणूक करत आहात. हे एका केंद्रीय राज्यमंत्री व खासदाराला अशोभनीय आहे.”
महापौर असताना बिल्डरच्या गाडीचा वापर?
धंगेकर यांनी मोहोळ महापौर असताना त्यांच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा गंभीर आरोप केला आहे.
“मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुणे शहराचे महापौर होते. ते महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (क्रमांक MH 12 SW 0909) वापरायचे.”
धंगेकर यांचा आरोप आहे की, ही गाडी पुणे महानगरपालिकेची किंवा मोहोळ यांची नव्हती, ती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची होती.
धंगेकर यांनी थेट संबंध जोडत म्हटले की, “हे तेच बिल्डर आहेत, ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे बिल्डर पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर आहेत.”
नीतिमत्ता आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न
धंगेकरांनी प्रश्न उपस्थित केला की, “महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का? साडेनऊ हजार कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता नाही आली का?” या बिल्डरची गाडी वापरल्यामुळे मोहोळ यांनी त्यांना फायदा होईल असे किती प्रकल्प मंजूर करून दिले? विशेषत: कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आले, अशी टीका धंगेकर यांनी केली.
‘दोन प्रकरणे घेऊन लवकरच भेटू’
या सर्व आरोपांच्या शेवटी धंगेकर यांनी मोहोळ यांना एक मोठा इशारा दिला आहे. “बाकी थेट जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात,” असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.



