Ambadas Danve : मंत्रिमंडळात राहून विखे पाटलांवर टीका कशासाठी? भुजबळ यांनी राजीनामा द्यावा!”

Ambadas Danve On Chhagan Bhujbal : जामीन कधीही रद्द होऊ शकतो’, सदन घोटाळ्याचा संदर्भ देत अंबादास दानवेंचा भुजबळांवर हल्लाबोल; भाजप ‘खेळ’ करत असल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगर :- बीडमध्ये ओबीसी समाजाने आयोजित केलेल्या महाएल्गार मेळाव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या मेळाव्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीतील सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट टीका केली होती. याच टीकेवरून आता शिवसेना (उबाठा) नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छगन भुजबळ यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. दानवे यांनी भुजबळ यांच्या भूमिकेला ‘राजकीय दुटप्पीपणा’ ठरवत थेट राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे.
‘मंत्रिमंडळात राहून विरोध कशासाठी?’
भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या धोरणाला विरोध करत विखे पाटील यांच्यावर केलेली टीका दानवे यांनी ‘दुटप्पीपणा’ असल्याचे म्हटले आहे. दानवे यांनी थेट प्रश्न केला की, “तुमचा जर मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध असेल, तर मग भुजबळ यांनी मंत्रिमंडळात का रहावे? मंत्र्यांचा राग आहे, तर मंत्रिमंडळात का राहावे? मंत्रिमंडळात राहून मंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करणे, हा राजकीय दुटप्पीपणा आहे आणि यातून नेतृत्व करणाऱ्या लोकांचा एक राजकीय बुरखा समोर आला आहे,” असे टीकास्त्र दानवे यांनी सोडले.
“जामीन कधीही रद्द होऊ शकतो”
दानवे यांनी केवळ राजकीय भूमिकेवरच नव्हे, तर भुजबळ यांच्या कायदेशीर स्थितीवरही बोट ठेवत भाजपवर निशाणा साधला. सदन घोटाळ्याचा संदर्भ देत त्यांनी आठवण करून दिली की, देवेंद्र फडणवीस यांनी सदन घोटाळ्याचे मोठे मोठे भाषणे केली होती आणि भाजपनेच त्यांना (भुजबळ) जेलमध्ये टाकले होते. याच भाजपच्या कृपेने ते (भुजबळ) सध्या जामिनावर आहेत.
यावरूनच दानवे यांनी “जामीन कधीही रद्द होऊ शकतो,” असे सूचक विधान केले आणि यामागे राज्य सरकार तर ‘खेळ’ करत नाही ना, असा थेट प्रश्न उपस्थित केला. मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा तिटकारा असेल तर भुजबळांनी तिकडे ढुंकूनही पाहू नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
महायुतीमधील गोंधळावर टीका
यावेळी अंबादास दानवे यांनी युतीच्या गोंधळावरही टीका केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणातून मराठी माणूस एकजुटीच्या भूमिकेकडे जात असून, येणाऱ्या दिवाळीच्या सणाला मराठी अस्मिता उजळून निघेल, असे त्यांनी सांगितले. बीडमधील मेळाव्यात विजय वडेट्टीवार यांच्या जुन्या वक्तव्यावरून भुजबळ यांनी त्यांना टार्गेट केल्याबद्दल दानवे म्हणाले की, “विजय वडेट्टीवार आणि भुजबळ खांद्याला खांदा आणि गळ्यात गळा घालून बोलत होते, त्यांना आता ते वाईट वाटत असेल त्याला काय करणार?”


