Nagpur News : निकाल आता एकाच दिवशी!-नागपूर खंडपीठाचे निर्देश; सर्व नगरपरिषदा/नगरपंचायतीचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार

Nagpur Court On Maharashtra Election : न्यायालयीन प्रक्रियेमुळे आयोगाला मोठा बदल करावा लागला; आचारसंहिता 20 डिसेंबरपर्यंत लागू राहणार
नागपूर/मुंबई :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. काही नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलण्यात आली होती (20 डिसेंबर रोजी मतदान होणार होते). यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाचे निर्देश
निकाल 21 डिसेंबरला: उच्च न्यायालयाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी, म्हणजे 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
आजचे मतदान (2 डिसेंबर): आज जे मतदान झाले आहे, त्याचे निकाल देखील 21 तारखेला जाहीर करण्यात येतील.
एक्झिट पोल: या निवडणुकीचे एक्झिट पोल 20 डिसेंबरला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील.
आचारसंहिता: निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील.
निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांना मिळालेले निवडणूक चिन्ह कायम राहील. मात्र, उमेदवारांनी निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवून देण्याची केलेली मागणी न्यायालयाने मान्य केलेली नाही.
मुख्यमंत्र्यांची प्रक्रियेवर नाराजी
या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, त्याचा निकाल पुढे जातोय, हे पहिल्यांदाच होतंय. हे यंत्रणांचं अपयश आहे. निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी.” ते पुढे म्हणाले की, “मतमोजणी पुढे ढकलणे हे मला तरी पटत नाही. हे अतिशय चूक आहे. माझी वैयक्तिक नाराजी मी व्यक्त केली होती ती कायद्यावर आधारित होती, निवडणूक आयोगावर नाही तर प्रक्रियेवर आहे.”
निकाल लांबल्याने प्रशासनावर परिणाम
निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे गेल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांवर मोठा परिणाम होणार आहे:
प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीची स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रे 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावी लागतील.
ही निवडणूक सुमारे 280 ठिकाणी होत असल्याने, तितकी मतमोजणी केंद्रे आणि स्ट्रॉंग रूम सुमारे तीन आठवड्यांसाठी राखीव ठेवावी लागतील.
या काळात सर्व स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवावा लागेल.
स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम असताना, निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूममध्ये जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असेल, ही प्रक्रिया रोज 21 डिसेंबरपर्यंत पार पाडावी लागेल.
याचा अर्थ विधानसभा निवडणुकीसाठी जेवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा कामी लागते, जवळपास तेवढीच यंत्रणा आता सुमारे तीन आठवड्यांसाठी नगर परिषद निवडणुकीसाठी कार्यरत राहील.



