क्राईम न्यूजमुंबई

मुंबई पोलिसांची ‘हाय-स्पीड’ कामगिरी: 7 बांगलादेशी घुसखोरांना जेरबंद करून एका महिन्यात शिक्षा!

Mumbai MIDC Police Arrested Illegal Bangladeshi : अवैध वास्तव्याचा पर्दाफाश; एम.आय.डी.सी. पोलिसांनी 10 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करून दाखवले ‘चातुर्य’

मुंबई :- मुंबईतील एम.आय.डी.सी. पोलिसांनी Mumbai MIDC Police अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकांना अटक करून, अवघ्या एका महिन्यात त्यांना न्यायालयात दोषी ठरवून शिक्षा मिळवण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या Mumbai Police कार्यक्षमतेचे आणि वेळेत तपास पूर्ण करण्याच्या क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे. गुप्त माहितीच्या आधारे सुरू झालेल्या या मोहिमेत मुंबई आणि पुणे येथून या घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले. Mumbai Police Latest News

अटक आणि जलद तपास

दिनांक 24 जून 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक जगताप आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील गुरुद्वारा मेन गेट, जिजामाता रोड परिसरातून बायजीद अयुब शेख (वय 47, मूळ रा. बांगलादेश) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता, तो बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पारपत्र आणि परकीय नागरिक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

बायजीद शेखने दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत अंधेरी पूर्व, मुंबई आणि कात्रज, पुणे येथून आणखी सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यामध्ये नसरीन बेगम (वय 38), रोजीना अख्तर (वय 39), काकोली अख्तर ब्रिष्टी (वय 25), रोमा बेगम मो. जिलानी (वय 31), पाखी बेगम मुशरफ हुसेन (वय 24) आणि कोहिनुर अख्तर उर्फ ऑलिजा अब्दुल मोनन शेख (वय 26) यांचा समावेश आहे. हे सर्वजण वेगवेगळ्या भागातून आले असले तरी, त्यांचे मूळ बांगलादेशातील असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव जगताप यांनी तपासात सातत्य राखत, अवघ्या 10 दिवसांत सातही आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र (Charge-sheet) दाखल केले. त्यांच्या जलद आणि प्रभावी तपासामुळे, मा. न्यायालयाने एका महिन्याच्या आत सातही आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. न्यायालयाने या आरोपींना एक महिना कारावास आणि 500 रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास दोन दिवसांचा वाढीव कारावास अशी शिक्षा दिली आहे. याबरोबरच, त्यांना बांगलादेशात परत पाठवण्याचे (Deport) आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. आरोपींना बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, लवकरच त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल.

बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (वाहतूक व कावसु अतिरिक्त कार्यभार) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग परमजित सिंह दहिया, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-10, मुंबई दत्ता नलावडे यांच्या आदेशाखाली आणि सहायक पोलीस आयुक्त, अंधेरी विभाग शशिकांत भोसले यांच्या देखरेखीखाली पार पडली. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश गुरव, पोलीस निरीक्षक (प्रशासन) संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक यश पालवे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव जगताप आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार टायगर मंडले, पुजारी, प्रवीण जाधव, नलावडे तसेच पोलीस शिपाई अमोल पवार, शितल माळी, संदेश देसाई, निलेश साळुंखे, जगताप यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0