मुंबई

Mumbai Crime News : ड्रग्ज माफियांना ‘M.C.O.C.Act’चा दणका! मुंबई पोलिसांची ऐतिहासिक कारवाई

•राज्यात पहिल्यांदाच अंमली पदार्थांची तस्करी संघटित गुन्हेगारी ठरली, नव्या कायद्याने कंबरडे मोडले

मुंबई :- राज्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचा आता अंत जवळ आला आहे. मुंबई पोलिसांनी नुकत्याच सुधारित झालेल्या ‘M.C.O.C.Act’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कायद्यानुसार अंमली पदार्थाच्या तस्करांवर महाराष्ट्रातील पहिली ऐतिहासिक कारवाई केली आहे. या नव्या कायद्यामुळे संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडणार असून ड्रग्ज माफियांचे मोठे जाळे उद्ध्वस्त करणे शक्य झाले आहे.

10 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने अंमली पदार्थ विरोधी कायद्यात मोठी सुधारणा केली होती. या नव्या कायद्यानुसार, अंमली पदार्थांच्या गुन्हेगारीचा समावेश थेट संघटित गुन्हेगारीत करण्यात आला आहे. यामुळे आता ड्रग्ज तस्करांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करणे पोलिसांना शक्य झाले आहे.

याच कायद्याचा वापर करत मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एक मोठी कारवाई केली. 7 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या एका प्रकरणात, पोलिसांनी तब्बल 766 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना, मुख्य आरोपी त्याच्या दोन साथीदारांसोबत एक टोळी बनवून अंमली पदार्थांचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी या संघटित गुन्हेगारीचा पुरावा गोळा करून ‘M.C.O.C.Act’ अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर, या तिन्ही आरोपींविरुद्ध ‘M.C.O.C.Act’ च्या कलम 3(1)(ii), 3(2) आणि 3(4) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अशा प्रकारे अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या टोळीवर M.C.O.C.Act अंतर्गत कारवाई होण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे.

या धडाकेबाज कामगिरीचे श्रेय पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाला जाते. तसेच, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहायक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर आणि बांद्रा अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

पोलिसांच्या या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, यापुढील काळात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0