मुंबईठाणे
Trending

Raj Thackeray : “मुंबई मराठी माणसाचीच! बोगस मतदार सापडला तर तिथेच फटकावून काढा”; राज ठाकरेंनी 53 शिलेदारांना दिला विजयाचा ‘राजमंत्र’

Raj Thackeray On Mumbai Election : “आमिषांना बळी पडू नका, मलाही ऑफर्स आल्या होत्या”; ‘शिवतीर्थ’वर उमेदवारांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी फुंकले रणशिंग

मुंबई | मुंबई महानगरपालिकेवर Mumbai BMC Election भगवा फडकवण्यासाठी ‘ठाकरे बंधू’ सज्ज झाले असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी आज आपल्या 53 उमेदवारांना विजयासाठी पराक्रमाची पराकाष्ठा करण्याचे आवाहन केले. “मुंबई मराठी माणसाची आहे आणि ही आपल्यासाठी शेवटची तसेच सर्वात मोठी संधी आहे,” असे भावनिक आवाहन करतानाच त्यांनी बोगस मतदानावरून कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत.

बोगस मतदानावर ‘मनसे स्टाईल’ प्रहार

राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या दिवशी होणाऱ्या गैरप्रकारांबाबत उमेदवारांना सतर्क केले. “प्रत्येक बूथवर आपली किमान 10 माणसे खंबीरपणे उभी करा. एकही बोगस मतदान झाले नाही पाहिजे. जर कोणी बोगस मतदान करताना किंवा बोगस मतदार सापडला, तर त्याला तिथेच फटकावून काढा,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपल्या सैनिकांना आदेश दिले. या विधानामुळे मुंबईतील संवेदनशील मतदान केंद्रांवर आता मनसेचा कडक पहारा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

“आमिषांना बळी पडू नका, निष्ठा राखा”

निवडणुकीच्या काळात होणाऱ्या घोडेबाजारावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी उमेदवारांना सावध केले. “तुम्हाला अनेक ऑफर्स येतील, पैशांची आमिषं दाखवली जातील. पण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. मलाही अशा अनेक ऑफर्स आल्या होत्या, पण मी सर्वांना पळवून लावले,” असे सांगत त्यांनी उमेदवारांना निष्ठेचा धडा दिला.

पराक्रमाची पराकाष्ठा करा

महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेना (UBT) सोबतच्या युतीमध्ये मनसेला 53 जागा मिळाल्या आहेत. या जागांवर विजय मिळवणे हे मनसेसाठी अस्तित्वाची लढाई असल्याचे राज ठाकरे यांनी अधोरेखित केले. “उमेदवारांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून मराठी माणसाच्या हितासाठी मैदानात उतरावे. ही संधी पुन्हा येणार नाही, त्यामुळे आता जीव ओतून काम करा,” असा कानमंत्र त्यांनी दिला.

मनसे उमेदवारांमध्ये नवचैतन्य

‘शिवतीर्थ’वर झालेल्या या भेटीनंतर मनसे उमेदवारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या संयुक्त सभांच्या नियोजनामुळे मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0