Kolhapur Breaking News : कोल्हापूरमध्ये एका फलकावरून तुफान राडा; दोन गटांत दगडफेक, जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड

Kolhapur Fighting News : ‘सर्किट बेंच’ परिसरात दोन समुदायांमध्ये जोरदार संघर्ष; अनेक वाहनांचे मोठे नुकसान
कोल्हापूर :- कोल्हापूर शहरात काल रात्री (22 ऑगस्ट) एका छोट्याशा वादातून दोन गटांमध्ये मोठा हिंसक संघर्ष झाल्याची धक्कादायक घटना घडली. सर्किट बेंच परिसरातील एका मंडपात लावलेल्या फलकावरून सुरु झालेला किरकोळ वाद पाहता पाहता इतका वाढला की, दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक, जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेने शहरातील वातावरण अचानक तणावपूर्ण बनले आहे. Kolhapur Latest News
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ नगर कमानीजवळील चौकात एका मंडळाचा वर्धापन दिन कार्यक्रम सुरू होता. यासाठी मोठे स्टेज उभारण्यात आले होते आणि मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात होती. याच दरम्यान, शेजारच्या मंडळातील काही कार्यकर्त्यांनी या आवाजाला आणि अडथळ्याला आक्षेप घेतला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र तो लवकरच शमला.
मात्र, उपलब्ध माहितीनुसार, नमाजानंतर हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आणि त्याचे हिंसक संघर्षात रूपांतर झाले. दोन गट एकमेकांना आव्हान देत रस्त्यावर उतरले. पाहता पाहता दोन्ही बाजूंकडून दगडफेक सुरू झाली. या धावपळीत अनेक लोक जखमी झाले, तर रस्त्यावरील अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. काही वाहने जाळल्याचाही आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वेगाने हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि शहरात शांतता प्रस्थापित केली. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
या घटनेवर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “एक गैरसमजूत आणि जुन्या वादामुळे दोन गटांमध्ये संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.” त्यांनी लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सोशल मीडियावर प्रक्षोभक संदेश न पसरवण्याचे आवाहनही केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ क्लिप्सच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. लवकरच काही आरोपींना ताब्यात घेतले जाईल अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.



