मुंबई

Raj Kundra : 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणी राज कुंद्राची 5 तास चौकशी ; शिल्पा शेट्टीलाही लवकरच समन्स

•5 कंपन्यांमध्ये पैसे वळवल्याची कबुली, 25 कोटी रुपये वैयक्तिक कामासाठी वापरल्याचे उघड ; दोघांविरुद्ध ‘लूक आऊट नोटीस’ जारी

मुंबई :- व्यावसायिक राज कुंद्रा याची 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सोमवारी तब्बल पाच तास चौकशी केली. एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी कुंद्रा आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्यावर 14 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच संदर्भात राज कुंद्राला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.

चौकशीत काय उघड झाले?

सोमवारी कुंद्रा आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. चौकशीदरम्यान, त्याने आपल्यावरील आरोपांबाबत बाजू मांडली. या चौकशीत कुंद्राने स्वीकारले की, त्याने गुंतवणूकदारांचे पैसे सतयुग गोल्ड, विहान इंडस्ट्रीज, इसेन्सिशअल बल्क कमोडिटी, बेस्ट डील आणि स्टेटमेंट इंडिया या पाच कंपन्यांमध्ये वळवले. त्याच्या बँक खात्याच्या तपासणीत, त्याने त्यातील 25 कोटी रुपये वैयक्तिक कामांसाठी वापरल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

दीपक कोठारी नावाच्या व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी 2015 ते 2023 दरम्यान कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ या ऑनलाइन शॉपिंग कंपनीत 60 कोटी 48 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, कुंद्रा दाम्पत्याने ही रक्कम कंपनीच्या कामकाजासाठी न वापरता, वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचा आरोप कोठारी यांनी तक्रारीत केला आहे. या कंपनीतील 87.6 टक्के शेअर्स या दोघांच्या नावावर होते.

शिल्पा शेट्टीचीही चौकशी होणार

या प्रकरणात शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवला जाणार आहे. गरज वाटल्यास तिलाही समन्स बजावण्यात येईल, असे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच, कुंद्रा आणि शेट्टी दोघेही वारंवार परदेशात प्रवास करत असल्याने, ते देशाबाहेर जाऊ नयेत म्हणून त्यांच्याविरोधात ‘लूक आऊट नोटीस’ जारी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0