Maharashtra Politics : आज पासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

•राज्यपाल 11 वाजता अभिभाषण करून अधिवेशनाची सुरुवात होणार आहे
मुंबई :- राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (3 मार्च ) सुरू होत आहे, तर 10 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत.आज 11 राज्याचे राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी 2024-25 च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार असल्याने, सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष या पुरवणी मागण्यांवर असणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार आणि मंत्र्याच्या राजीनाम्याबाबत विरोधक नेमकी कोणती भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे. त्याचबरोबर, मविआ विरोधी पक्षनेता म्हणून आज कोणाचे नाव जाहीर करणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तसेच कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा, बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट लाटल्याप्रकरणी कोर्टाने 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावलेले माणिकराव कोकाटे या राष्ट्रवादीच्या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही राहणार आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणासह महिलांच्या सुरक्षेचा मुद्द्यांवरही सरकारला जाब विचारला जाणार आहे.
अधिवेशन सुरु होण्याच्या आधी सरकारच्या वतीने विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची परंपरा आहे. आजही सर्वात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. त्यानंतर त्यांनी काळी वेळ मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा केली.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचे ट्विट (Rohit Pawar Tweet)
आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक म्हणून जनतेने दिलेली जबाबदारी अधिकाधिक चांगल्याप्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करू.
सरकार पाशवी बहुमतात मश्गूल असताना राज्यात महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार, अगदी मंत्र्यांची मुलगीही सुरक्षित नसणं, गुन्हेगारांना साथ देणाऱ्या आणि न्यायालयाने शिक्षा दिलेल्या मंत्र्यांना पदावर कायम ठेवण्याचा सरकारचा निगरगट्टपणा, सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोकांकडूनच महापुरुषांचा वारंवार अवमान केला जात असतानाही त्यांना संरक्षण देणं, तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी, भ्रष्टाचार, बेरोजगारी यासह इतर ज्वलंत प्रश्नांवर विरोधक म्हणून सरकारला जाब विचारू आणि निर्णय घेण्यास भाग पाडू…