Solapur Accident News : सोलापूरजवळ बस-ट्रकचा भीषण अपघात; 16 प्रवासी जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर

Solapur Bus And Truck Accident : बोरामणी गावाजवळ घडली घटना; बिदरहून पंढरपूरकडे येणाऱ्या बसला धडक
सोलापूर :- सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. बिदरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या एका बसला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून, यात बसमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात एकूण 16 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताचे स्वरूप
अपघात इतका भीषण होता की, बसचा एका बाजूचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.
सर्व जखमी प्रवाशांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत. यापैकी 5 ते 6 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. जखमींच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देण्यात आली असून, अनेकांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली आहे.


