पुणे

Eknath Khadse : खराडी ‘रेव्ह पार्टी’ वाद: रोहिणी खडसे यांच्या पतीला अटक, एकनाथ खडसेंकडून कारवाईवर प्रश्नचिन्ह?

•पोलीस कारवाई संशयास्पद, बदनामीचा प्रयत्न असल्याचा खडसेंचा आरोप; ‘रेव्ह पार्टी’ची व्याख्या विचारली

पुणे :- पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीत रविवारी (27 जुलै) पहाटे पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीवर धाड टाकल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून, अंमली पदार्थ देखील जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, ही कारवाई संशयास्पद असल्याचा आणि पोलिसांकडून बदनामीचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

“रेव्ह पार्टीची व्याख्या काय?” – एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांनी पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, “पोलिसांच्या कारभाराविषयी माझ्या मनात काही प्रश्न आहेत. तिथे पाच-सात जणांची पार्टी चालू होती. तिथं कुठलंही संगीत नाही, नृत्य नाही, कुठलाही गोंधळ नाही. एका घरात पाच-सात जण पार्टी करत होते, त्याला तुम्ही रेव्ह पार्टी कसं काय म्हणता? असं असेल तर देशात, राज्यात कुठेही पाच-सात जण मिळून पार्टी करत असतील तर त्याला रेव्ह पार्टी म्हणणार का? रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या काय ती पोलिसांनी स्पष्ट करावी. त्यामुळे रेव्ह पार्टी आयोजित केली म्हणून माझ्या जावयाची बदनामी करण्याचं प्रयोजन काय?”

खडसे यांनी कारवाईच्या व्हिडीओ फुटेजवरही आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, “पोलिसांनी जिथे कारवाई केली त्या कारवाईचं व्हिडीओ फुटेज प्रसारमाध्यमांवर दिसतंय. पोलिसांना या गोष्टी सार्वजनिक करण्याचा अधिकार कोणी दिला? एखाद्याच्या खासगी आयुष्यातील घटनांचं चित्रीकरण करून ते जगासमोर आणण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? पोलिसांनी निव्वळ बदनामीसाठी हे कृत्य केलं आहे का? अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाईदरम्यान पोलिसांना संशयित आरोपींचा चेहरा दाखवण्याचा अधिकार नाही. महिला असो अथवा पुरुष, पोलीस कोणाचेही चेहरे दाखवता येत नाहीत. मात्र, या कारवाईदरम्यान पोलिसांनी सर्व महिला व पुरुषांचे चेहरे दाखवले. कारवाईत पोलिसांनी बदनामी करण्याचं ध्येय ठेवल्याचं दिसत आहे.”

डॉ. प्रांजल खेवलकर यांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी करण्यावरही खडसे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पोलिसांनी या कारवाईत डॉ. प्राजंल खेवलकर यांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी का केलंय? त्यांच्याकडे कुठलाही अंमली पदार्थ सापडलेला नाही. त्यांच्यावर याआधी कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. तसेच ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत. उलट डॉ. खेवलकर हे वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेलं नाव आहे. पोलिसांनी दावा केला आहे की त्यांना या प्रकरणात एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये २.७ ग्रॅम अंमली पदार्थ सापडले आहेत. मग ती मुलगी पहिल्या क्रमांकाची आरोपी असायला हवी आणि डॉ. खेवलकरांना साक्षीदार करायला हवं होतं, कारण त्यांच्याकडे काहीच सापडलेलं नाही.”

ससून रुग्णालयाच्या अहवालावरही शंका

डॉ. खेवलकर यांच्या वैद्यकीय अहवालासंदर्भातही खडसे यांनी संशय व्यक्त केला आहे. “डॉ. खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल आला असल्याचे काही वृत्तवाहिनींच्या माध्यमातून कळले. इथे एक साधा प्रश्न पडत आहे की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तात्पर्यतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो, मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागत आहे? मागच्या वर्षी पुण्यात जे पोर्शे अपघात प्रकरण झाले होते. त्यात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास या ससून रुग्णालयाला लाभला आहे याची सहज आठवण झाली. त्यामुळे डॉ. खेवलकर यांच्या अंमली पदार्थांच्या सेवनाची चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0