India Vs England Test Series : सिराज-कृष्णाची धारदार गोलंदाजी, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

Ind vs Eng 5th test match :- अंतिम कसोटीत 6 धावांनी सनसनाटी विजय, पाच सामन्यांची मालिका आणि 2-2 ने बरोबरीत
Ind vs Eng 5th test match :- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत इंग्लंडवर 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे. गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या धारदार गोलंदाजीमुळे भारताने 374 धावांचे आव्हान यशस्वीरित्या राखले. या विजयामुळे भारताने 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली.
अंतिम कसोटीच्या चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडने 6 गडी गमावून 339 धावा केल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी त्यांना 35 धावांची आवश्यकता होती, तर भारताला 4 विकेट्सची गरज होती. सर्वांचे लक्ष पाचव्या दिवसाच्या खेळाकडे लागले होते.




पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला विजयाची संधी दिली नाही. मोहम्मद सिराजने एकट्याने 5 विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला प्रसिद्ध कृष्णाने अप्रतिम साथ देत 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तर आकाश दीपने 1 बळी घेत गोलंदाजीची सुरुवात केली. या तिघांच्या प्रभावी माऱ्यामुळे इंग्लंडचा डाव 85.1 षटकांत 367 धावांवर संपुष्टात आला.
सिराजने सामन्यात सर्वाधिक 5 विकेट्स घेऊन भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तर प्रसिद्ध कृष्णाच्या 4 बळींनी भारताचा विजय निश्चित केला. या थरारक विजयामुळे भारतीय संघाने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याचा एक नवा अध्याय लिहिला आहे.



