Kalyan Crime News : महिलेच्या अब्रूवर घाला घालणाऱ्या विकृताला कोर्टाचा जोरदार चपराक!

•फक्त ‘एक महिन्यात’ न्यायालयाचा निर्णय – आरोपीस 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
कल्याण | महिलेचा विनयभंग करणाऱ्या विकृत आरोपीला न्यायालयाने केवळ एका महिन्यात सक्त शिक्षेचा चपराक देत समाजात खळबळजनक संदेश दिला आहे. वडाळा, मुंबई येथील ओमकार निकाळजे (वय 29) या नराधमाने 34 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना 3 जून 2025 रोजी सह्याद्रीनगर, कल्याण पश्चिम येथे घडली होती.
खडकपाडा पोलीस ठाण्यात पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवताच, पोलीस उपनिरीक्षक अमित पवार आणि त्यांच्या पथकाने अवघ्या 6 तासांत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल होऊन न्यायालयाने तातडीने सुनावणी सुरू केली.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आरती शिंदे यांनी न्यायाच्या गतीला वेग देत ओमकार निकाळजे यास 1 वर्ष सक्त मजुरी, 1 महिना साधा कारावास आणि 5000 रुपयांचा दंड ठोठावला. यातील 2500 रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेशही दिला.
या प्रकरणात सरकारी वकिल प्रकाश सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, तपासी अधिकारी अमित पवार, पोलीस हवालदार ठोंबरे, पोलीस हवालदार नलावडे आणि महिला पोलीस हवालदार पाटील यांनी एकजुटीने काम करून न्यायालयात ठोस पुरावे सादर केले. त्यामुळे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले.


