Kalyan News : शांतीदूत सोसायटीच्या मुद्द्यावरून कल्याणमध्ये राजकीय ‘युद्ध’

•माजी आमदार नरेंद्र पवार आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्यात आरोप-प्रत्यारोप; पुनर्विकासाचा प्रश्न चिघळला
कल्याण :- कल्याणमधील चिकणघर येथील शांतीदूत सोसायटीच्या रखडलेल्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शिंदे शिवसेनेचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. पवार यांनी या विषयावर बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर, भोईर यांनी त्यांच्यावर ‘अनावश्यकपणे विषय चिघळवत असल्या’ची टीका केली, तर पवार यांनी भोईर यांना ‘विकासकाची नव्हे, तर जनतेची वकिली करा’ असा सल्ला दिला आहे.
कल्याण पश्चिममधील शांतीदूत सोसायटीचा पुनर्विकास खासगी विकासकाकडे सोपवून 13 वर्षे झाली आहेत. या प्रकल्पातील 184 सदस्य आपली घरे सोडून भाड्याच्या घरात राहायला गेले. विकासकाने त्यांना भाडे देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र गेल्या 46 महिन्यांपासून त्यांना भाडे मिळालेले नाही, असा आरोप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. या रखडलेल्या प्रकल्पामुळे रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत.
आमदार भोईर यांनी शांतीदूत सोसायटीच्या सदस्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, “हा विषय चिघळवण्याची गरज नाही. शासनाकडून यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हाडा यासंदर्भात एक अहवाल सरकारला देणार आहे. म्हाडाने संबंधित विकासक काम करू शकत नाही, असा अहवाल दिल्यास सरकार योग्य निर्णय घेईल.” असे सांगत त्यांनी पवार यांना उपोषण न करण्याचा सल्ला दिला.
यावर पलटवार करताना माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले, “आमदार भोईर यांना जनतेने निवडून दिले आहे. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी उभे राहावे, विकासकाच्या बाजूने बोलू नये. विकासकाने प्रकल्पासाठी बँकांकडून 350 कोटींचे कर्ज घेतले असतानाही प्रकल्प का रखडला, हा प्रश्न त्यांना पडत नाही का?”
यापूर्वी पावसाळी अधिवेशनात आमदार योगेश टिळेकर यांनीही शांतीदूत सोसायटीचा प्रश्न उपस्थित केला होता. आता या प्रकरणात पवार यांनी रहिवाशांच्या बाजूने बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या सोसायटीचा प्रश्न शासन दरबारी असून म्हाडाचा अहवाल आल्यानंतरच पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


