मुंबईत मोठी कारवाई : MCOCA अंतर्गत गुन्ह्यातील पाहिजे महिला आरोपी अटक

मुंबई : बृहन्मुंबई पोलीसांच्या Mumbai Police अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (Anti Narcotics Cell) आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. तीन वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारी आणि मेफेड्रॉन (MD) या अंमली पदार्थाच्या धंद्यात सक्रिय असलेली महिला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. Mumbai Latest Crime News
बांद्रा युनिटकडे दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ६१/२०२५ मध्ये पोलिसांनी ७६६ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केला होता. प्राथमिक तपासात या गुन्ह्यामागे संघटित टोळी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने परवानगी देऊन हा गुन्हा MCOCA कायदा अंतर्गत वाढवण्यात आला.
अटक कशी झाली?
सदर गुन्ह्यात अदनान आमीर शेख (वय २४) याला आधीच अटक झाली होती. त्याची साथीदार कायनात जब्बार शेख ऊर्फ कुरेशी (वय २६) हिचा शोध घेतला जात होता. दरम्यान, ती दहिसर येथे राहणाऱ्या बहिणीकडे लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. कौशल्यपूर्ण सापळा रचून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
न्यायालयाने आरोपीस १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपासाचे नेतृत्व अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे व सहायक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांनी केले.
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध छेडलेल्या मोहीमेला ही कारवाई मोठे यश मानले जात असून, आगामी काळात अशा टोळ्यांवर आणखी कठोर गदा आणली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.



