क्राईम न्यूजठाणेमुंबई

Bhiwandi Crime News : भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणी 7 आरोपींवर ‘मोक्का’

Bhiwandi Prafull Tangdi Latest News : पूर्व वैमनस्यातून केली होती हत्या; आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड

भिवंडी :- भिवंडी येथे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा चुलत भाऊ तेजस तांगडी यांच्या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात आरोपींवर आता मोक्का (MCOCA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते आणि भाजपचे पदाधिकारी व गावकऱ्यांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपास करून सात आरोपींना अटक केली होती. आता त्यांच्यावर मोक्का लावल्यामुळे या गुन्ह्याचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

नेमके काय घडले?

महिन्याभरापूर्वी प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा चुलत भाऊ तेजस तांगडी हे आपल्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी विकी म्हात्रे आणि कल्पेश वैती हे तिथे आले. त्यांच्यात पूर्ववैमनस्य असल्यामुळे त्यांनी तलवार आणि सुऱ्याने प्रफुल्ल तांगडी यांच्यावर हल्ला केला. प्रफुल्ल यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या तेजसवरही त्यांनी वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, मुख्य आरोपी विकी म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले. 2013 पासून ते एकत्र येऊन मारामारी करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि अवैध शस्त्रे बाळगणे असे अनेक गुन्हे त्यांनी केले आहेत.

या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आधारे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी यांनी आरोपींविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आरोपींविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी विकी म्हात्रे, कल्पेश वैती, किसन पवार, गणपत साबळे, हर्षल तांगडी, अजय तांगडी आणि नितेश तांगडी यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0