Mumbai Political News : मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा शनिवारी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’

•मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा मोर्चा; दुपारी 4 च्या आत आंदोलन संपवण्याची पोलिसांना हमी
मुंबई :- येत्या शनिवारी (1 नोव्हेंबर 2025) मुंबईत महाविकास आघाडीतील पक्ष (शिवसेना-ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकत्रितपणे मतदार याद्यांमधील कथित घोटाळ्या विरोधात भव्य मोर्चा काढणार आहेत. राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही कार्यवाही न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
या मोर्चाच्या परवानगीसाठी शिवसेना (ठाकरे), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) सह सहभागी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन चर्चा केली.
मोर्चाचे स्वरूप
या मोर्चाला ‘सत्याचा मोर्चा’ असे नाव देण्यात आले असले तरी, मुंबईकरांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर माहिती दिली की, मतदार याद्यांमधील घोळबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने हा मोर्चा काढला जात आहे. मोर्चा मेट्रो सिनेमापासून सुरू होऊन महापालिका मुख्यालयासमोर थांबेल आणि तिथे प्रमुख नेत्यांची भाषणे होतील. भेटीदरम्यान पोलिसांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार सावंत यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अनिल परब, काँग्रेस नेते सचिन सावंत आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी उपस्थित होते.
वेळेचे बंधन
मोर्चाच्या वेळेबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले की, दुपारी एक वाजता लोक जमण्यास सुरुवात होईल आणि दोन वाजण्याच्या दरम्यान मोर्चाला सुरुवात केली जाईल. दोन ते अडीच तासांमध्ये मोर्चा संपवून सायंकाळी चारच्या आत आम्ही तो संपवणार आहोत. आमच्या या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेतली आहे, असे त्यांनी नमूद केले. या मोर्चात विविध पक्षांचे नेते आणि मोठ्या संख्येने कामगार वर्ग देखील सहभागी होईल, असे कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांनी यावेळी सांगितले.


