मुंबई

Bhandup News : मुंबई हादरली! भांडूपमध्ये बेस्ट बसने 13 प्रवाशांना चिरडले; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक

•बस रिव्हर्स घेताना घडला भीषण अपघात; मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश, बस चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई/भांडूप | भांडूप रेल्वे स्थानकाजवळील पश्चिम बस डेपो परिसरात मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास मृत्यूने थैमान घातले. कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीत बेस्ट बसने चिरडल्यामुळे 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. बस चालकाने निष्काळजीपणे बस रिव्हर्स घेताना हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

नेमकी घटना काय?

रात्री 10 वाजताच्या सुमारास भांडूप स्टेशन परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होती. यावेळी बस डेपोमध्ये एक बेस्ट बस रिव्हर्स घेताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट मागच्या बाजूला उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर धावून गेली. काही क्षणातच आरडाओरडा आणि पळापळ सुरू झाली. बसखाली अनेक लोक चिरडले गेल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना बसखालून बाहेर काढले.

4 जणांचा मृत्यू; मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू

या भीषण अपघातात 3 महिला आणि 1 पुरुष अशा एकूण 4 जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये एका 31 वर्षीय महिलेचा समावेश असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. याशिवाय, 51 वर्षीय प्रशांत लाड यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चालक पोलिसांच्या ताब्यात; तपासाला वेग
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, 108 रुग्णवाहिका आणि भांडूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाचा रोष लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ बस चालकाला ताब्यात घेतले आहे. चालक नशेत होता का किंवा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. बेस्ट प्रशासनाकडूनही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भांडूप परिसरात शोकाकुल वातावरण
गर्दीच्या वेळी आणि हक्काच्या प्रवासाच्या साधनामुळे घडलेल्या या भीषण अपघातामुळे भांडूप परिसरात शोककळा पसरली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0