Mumbai Local Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; मालगाडीत बिघाडामुळे लोकलसेवा एक तास विलंबाने

Mumbai Local Train Update : टिटवाळा-आंबिवलीदरम्यान तांत्रिक बिघाड, गणेशभक्तांचे प्रचंड हाल
कल्याण :- गणेशोत्सवाच्या धामधुमीतच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. टिटवाळा-आंबिवलीदरम्यान एका मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलसेवा एक तास विलंबाने धावत होत्या. यामुळे गणेशभक्तांसह सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. Mumbai Local Train Update
गुरुवारी दुपारी ही घटना घडली. मालगाडीत बिघाड झाल्याने कसाऱ्याहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकल एकामागे एक थांबल्या. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर इच्छितस्थळी पोहोचणे कठीण झाले. विशेषतः मुंबई आणि ठाण्यातील मोठ्या गणेश मंडळांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या गणेशभक्तांना या खोळंबलेल्या वेळापत्रकामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
रेल्वे सेवेवर परिणाम
या बिघाडाचा परिणाम केवळ एका दिशेवरच झाला नाही. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे येणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती, तर सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलही धीम्या गतीने धावत होत्या.
या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने तात्काळ पावले उचलली. मालगाडी मार्गस्थ करण्याचे आणि लोकल सेवा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून लवकरच सेवा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


