
Naxalites in Andhra Pradesh News : आंध्र प्रदेश सीमेवर भीषण चकमक; ‘सेंट्रल कमिटी’ सदस्य हिडमासह 6 माओवादी ठार; पत्नीचाही खात्मा
ANI :- आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दलांना माओवादी नेटवर्कविरुद्धचे गेल्या अनेक वर्षांतील सर्वांत मोठे यश मिळाले आहे. आज (18 नोव्हेंबर) झालेल्या एका भीषण चकमकीत कुख्यात माओवादी कमांडर माडवी हिडमा (वय 43) याला ठार करण्यात आले आहे. या चकमकीत हिडमासह एकूण सहा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
माओवाद्यांचे मोठे नेतृत्व संपुष्टात
माओवादी संघटनेच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य आणि PLGA बटालियन क्रमांक 1 चा प्रमुख असलेला हिडमा ठार झाला आहे. सूत्रांनुसार, त्याची दुसरी पत्नी राजे उर्फ राजक्का देखील या चकमकीत मारली गेली आहे. हिडमा हा सीपीआय (माओवादी) च्या केंद्रीय समितीचा सर्वात तरुण सदस्य होता आणि त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. आंध्र प्रदेश पोलिसांनी अल्लुरी सीताराम राजू (एएसआर) जिल्ह्यातील मारेदुमिल्ली येथे ही निर्णायक कारवाई केली.
हिडमाचे क्रूर हल्ले
वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षापासून माओवादी संघटनेत सक्रिय झालेल्या हिडमावर 500 हून अधिक हत्यांचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होता. त्याने अनेक मोठे आणि क्रूर हल्ले घडवून आणले होते, ज्यात 2010 चा दंतेवाडा हल्ला (76 सीआरपीएफ जवान शहीद), 2013 चे झिरम व्हॅली हत्याकांड (काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह 27 जणांचा मृत्यू) आणि 2018 ते 2021 दरम्यान झालेले अनेक मोठे हल्ले यांचा समावेश आहे.
पोलिसांची भूमिका
या ऑपरेशनबद्दल आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक हरीश कुमार गुप्ता यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली येथे पोलीस आणि माओवाद्यांमध्ये सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान चकमक झाली. यात एका प्रमुख माओवादी नेत्यासह सहा माओवादी ठार झाले आहेत. हिडमाच्या मृत्यूमुळे बस्तर आणि आंध्र प्रदेश सीमेवरील माओवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला असून, सध्या मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू आहे.


