Sushma Andhare : ‘रुपाली चाकणकरांचा तातडीने राजीनामा घ्या’; फलटण प्रकरणात सीडीआर लीक केल्याच्या आरोपावरून सुषमा अंधारेंची मागणी

•अंधारेंना ‘हक्कभंगाची नोटीस’ आणि ’50 कोटींच्या मानहानीचा दावा’; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी प्रकरण तापले
मुंबई :- सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली.
चाकणकरांवर सीडीआर लीक केल्याचा आरोप
फलटण प्रकरणात तपास प्रक्रिया आणि गोपनीयता भंग केल्याचा आरोप अंधारे यांनी केला. त्या म्हणाल्या, “जेव्हा एखादी घटना घडते, तेव्हा घटनास्थळी आढळणारे मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर साहित्य सील केले जाते आणि त्याची माहिती गोपनीय असते. न्यायालयाच्या परवानगीनंतरच पुढील तपास केला जातो.”
प्रश्न उपस्थित: “आम्ही सीडीआरची मागणी करत असताना कोणी बोलत नाही, मात्र या प्रकरणात मुलीच्या सीडीआरबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा पत्रकार परिषदेत बोलतात. पोलिसांना हा अधिकार कोणी दिला? आणि महिला आयोगाने कोणत्या अधिकाराने सीडीआरबाबत माहिती पत्रकार परिषदेत सांगितली?”
राजीनाम्याची मागणी: “त्यांना तो अधिकार नसेल, तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला पदावर ठेवायचा की नाही, याचा विचार करावा. राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य महिला आयोगावर राजकीय हेतूने प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागवावे. तसेच, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रमुखांनी (सुनील तटकरे) रुपाली चाकणकर यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा,” अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.
अंधारेंना दोन नोटीसा
या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी त्यांच्याविरोधात झालेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडींची माहिती दिली.
हक्कभंगाची नोटीस: प्रवीण दरेकर यांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या हक्कभंग प्रस्तावावर स्पष्टीकरण दिले असतानाच, फलटण प्रकरणाच्या घडामोडी सुरू असताना काल माझ्या घरी पुन्हा एक हक्कभंगाची नोटीस आली आहे, असे त्यांनी सांगितले.
मानहानीचा दावा: यासोबतच, 50 कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस देखील आपल्याला आली असून, त्या अनिल बोरनारे यांच्या स्वाक्षरीने आल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही नोटीसांचा आपण स्वीकार करत असल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले.


