Election Commission : विरोधी पक्षांची मागणी दुर्लक्षित; देशभरात ‘SIR’ फेरनिरीक्षण, पण महाराष्ट्राचा समावेश नाही

Election Commission Latest News : निवडणूक आयोगाकडून 12 राज्यांमध्ये मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम; महाराष्ट्रात जुन्याच यादीवर स्थानिक निवडणुका होण्याची चिन्हे
ANI :- देशातील 12 राज्यांमध्ये उद्यापासून (16 ऑक्टोबर) मतदार यादीचे ‘विशेष सखोल फेरनिरीक्षण’ (SIR) सुरू करण्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. मात्र, या दुसऱ्या टप्प्यातील यादीत महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही, ज्यामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जुन्याच आणि वादग्रस्त मतदार याद्यांच्या आधारावर होण्याची चिन्हे दिसत आहेत.
विरोधकांची मागणी दुर्लक्षित
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यांनी राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचा आणि अनेक नावे वगळल्याचा आरोप करत, हा गोंधळ संपल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली होती.
‘SIR’ फेरनिरीक्षणाचा दुसरा टप्पा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘SIR’ (विशेष सखोल फेरनिरीक्षण) मोहिमेत या 12 राज्यांमध्ये मतदार याद्या अद्ययावत केल्या जातील, नवीन मतदार जोडले जातील आणि त्रुटी दूर केल्या जातील.
‘SIR’ मध्ये समाविष्ट राज्ये (12)
अंदमान निकोबार, गोवा, पुद्दुचेरी, छत्तीसगढ, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि लक्षद्वीप.
महाराष्ट्रातील परिस्थिती
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. देशभरात ‘SIR’ मोहीम सुरू होत असताना महाराष्ट्राचा त्यात समावेश न झाल्याने, विरोधी पक्षांची मतदार याद्या अद्ययावत करण्याची मागणी फेटाळली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका जुन्याच मतदार याद्यांच्या आधारे होण्याची शक्यता बळावली आहे.



