Bhaskar Jadhav. : अतिवृष्टीवरील चर्चेतून मंत्र्यांची दांडी! – भास्कर जाधव यांचा सभागृहात तीव्र संताप, “शेतकऱ्यांना फसवी पॅकेजेस देऊ नका!”

Nagpur Winter Session : “एनडीआरएफचे निकष वाढवले का?” थेट जाब; “बिहारमध्ये मदत मागितली नव्हती, मग इथे प्रस्ताव कशाला?” केंद्रीय पथकाच्या पाहणीवरही हल्लाबोल
नागपूर :- राज्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या बिकट परिस्थितीवर आज (11 डिसेंबर) विधानभवनामध्ये चर्चा सुरू असताना अनेक महत्त्वाच्या मंत्र्यांनी दांडी मारल्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी महायुती सरकारवर जोरदार प्रहार केला. सलग दुसऱ्या दिवशी जाधव यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे सत्ताधारी भाजप आमदारांनीही मंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल खेद व्यक्त केला.
जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले. ते म्हणाले, “एनडीआरएफचे निकष तुम्ही वाढवले आहेत का? कापूस, संत्री, कांदा असेल किंवा कोकणामध्ये झालेले मोठे नुकसान, यावर सरकारने काय ठोस केले?” त्यांनी बिहारच्या मदतीचा दाखला देत सरकारला थेट जाब विचारला, “बिहारमध्ये कोणी मदत मागितली होती का? मग इथे कशाला प्रस्ताव मागता?”
शेतकऱ्यांसाठी दिली जाणारी मदत फसवी असल्याचे सांगत जाधव म्हणाले, “शेतकऱ्यांना तीन ते चार हेडखाली मदत दिली जाते, ज्याला पॅकेज म्हणतात, पण ही फसवी पॅकेजेस आहेत. 32 हजार कोटींचे पॅकेज दिले असे बोलतात, तर ते सभागृहात सांगा. पुन्हा असे फसवे पॅकेज देऊ नका.”
केंद्रीय पथकाच्या पाहणीवरही जाधव यांनी हल्लाबोल केला. “केंद्रीय पथक कधी आलं होतं? दिवसा की रात्री? दिवसा त्यांनी पाहणी केली का?” अशी विचारणा करत त्यांनी पाहणीच्या सत्यतेवरच शंका घेतली. तसेच, “75 हजार कोटींच्या पुरवण्या मांडल्या गेल्या, याचा अर्थ तुमचे बजेट पुरतं कोलमंडलं आहे,” असे म्हणत त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे नद्यांनी जमीन खरडून काढली आहे. त्यामुळे एका सीजनपुरती मदत करून चालणार नाही. सर्वांचा एकत्र अनुभव घेऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत जाधव यांनी नोंदवले.



