Kharghar News : खारघरमध्ये पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत: रमझान शेख यांचा तत्पर हस्तक्षेप

खारघर जितिन शेट्टी : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. खारघर सेक्टर ३४ मधील एका मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या घटनेची तात्काळ दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रमझान शेख यांनी तत्परतेने हस्तक्षेप करत वाहतूक पूर्ववत करण्यात मोलाची भूमिका बजावली.
वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रमझान शेख यांनी तातडीने पनवेल महानगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत पालिका अधिकारी कुणाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील टीमने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक मनुष्यबळ आणि साहित्याच्या सहाय्याने काही तासांतच कोसळलेले झाड हटवण्यात आले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला.
या त्वरित कार्यवाहीबद्दल स्थानिक नागरिकांनी रमझान शेख, पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी कुणाल गायकवाड, ओमकार गायकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. नागरिकांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणारे रमझान शेख यांचे कार्य लोकप्रतिनिधींच्या कर्तव्याची प्रेरणादायी मिसाल ठरले आहे.



