Ahilyanagar Bribe News : ७ हजारांची लाच मागणाऱ्या सेवानिवृत्त अभियंत्यावर कारवाई – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

अहिल्यानगर | ८ सप्टेंबर २०२५ :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या कारवाईत जिल्हा परिषद, दक्षिण बांधकाम उपविभाग, श्रीगोंदा येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता (वर्ग-३) प्रकाश निवृत्ती पाचनकर (वय ५८, सेवानिवृत्त) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने श्रीगोंदा तालुक्यातील दोन रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाची कामे हाती घेतली होती. या कामांचे बिल काढण्यासाठी SQM (स्टेट क्वॉलीटी मॉनिटरिंग) अहवाल आवश्यक होता. हा अहवाल पुण्यातील गुणवत्ता निरीक्षक आर. एस. देशमुख यांच्याकडून मिळवून देण्यासाठी प्रकाश पाचनकर यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी ३,५०० रुपये, असे एकूण ७,००० रुपयांची लाचेची मागणी केली होती.
लाच मागणीची तक्रार १६ एप्रिल २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे दाखल झाली होती. त्यानंतर पडताळणी केली असता, आरोपी पाचनकर यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला.
श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गु.र.क्र. ८२१/२०२५ अन्वये, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईतील अधिकारी
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्या मदतीला पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे पर्यवेक्षण अधिकारी म्हणून तर पोलीस कर्मचारी सचिन सुदुक, गजानन गायकवाड आणि चालक दशरथ लाड सहभागी होते.
या संपूर्ण कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनिल दोरगे (नाशिक परिक्षेत्र) यांनी मार्गदर्शन केले.
नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की, लाच मागणाऱ्या कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी त्वरित विभागाशी संपर्क साधावा.


