मुंबई
Trending

Devendra Fadnavis : पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधली पंतप्रधानांशी भेट

CM Devendra Fadnavis Meet PM Modi : केंद्र सरकार सकारात्मक, पण प्रस्ताव येत्या दोन आठवड्यांत; ‘नुकसानीचा पूर्ण आढावा घेऊनच केंद्राला अंतिम प्रस्ताव पाठवणार’

मुंबई :- राज्यातील मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून (NDRF) भरीव आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी मदतीबाबत सकारात्मक आश्वासन दिले असून, राज्याचा प्रस्ताव आल्यानंतर तातडीने निधी देण्याचे त्यांनी स्पष्ट केले असल्याची माहिती फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. राज्याकडून हा प्रस्ताव पुढील दोन आठवड्यांमध्ये केंद्राला सादर केला जाण्याची शक्यता आहे.

भरीव निधीसाठी केंद्राकडे प्रस्ताव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, त्यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे पत्र गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मुंबईत दिले होते. शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन राज्याची बाजू मांडली.

सध्याची मदत: राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण निधीतून शेतकऱ्यांना 2 हजार कोटींहून अधिक तातडीची मदत दिली आहे.

प्रस्ताव देण्यास विलंब का?

अतिवृष्टीने झालेले नुकसान मोठे असल्याने केंद्राच्या भरीव निधीची गरज आहे. मात्र, नुकसानीचा नेमका आकडा सांगता येणार नाही, कारण अजून आढावा घेण्याचे काम पूर्ण झालेले नाही. शिवाय, येत्या दोन दिवसांत (27-28 सप्टेंबर) पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज असल्याने, केंद्राला एकदाच अंतिम प्रस्ताव सादर करता यावा, यासाठी पूर्ण नुकसानीचा आढावा घेऊनच तो पाठवला जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

कर्जमाफीचे आश्वासन लवकरच पूर्ण करणार

फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनावरही भाष्य केले. तात्काळ आर्थिक मदत देण्याला सध्या राज्य सरकारचे प्राधान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफीचे धोरण

“कर्जमाफीसंदर्भात घोषणापत्रात आश्वासन दिले आहे, त्याची पूर्तता केली जाईल. त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. कर्जमाफी वारंवार करता येत नाही, त्यामुळे कर्जमाफीचे धोरण प्रभावीपणे अमलात येण्याच्या दृष्टीने अभ्यास केला जात आहे,” असे फडणवीस म्हणाले.

‘ठाकरेंनी शहाणपण शिकवू नये!’

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मराठवाडा दौरा करून एकरी 50 हजार रुपयांची मदत आणि पंतप्रधानांनी मराठवाड्याचा दौरा करावा, अशी मागणी केली होती. त्यावर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

फडणवीस म्हणाले की, पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मोदींचा राज्यात दौरा होणार नाही. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, “उद्धव ठाकरे यांनी आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारला शहाणपण सांगू नये.”

फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील ‘पीएम मदत निधी’चा मुद्दा उपस्थित केला:

“करोनाच्या काळात ‘पीएम मदत निधी’सारखा फंड तयार करण्याची परवानगी केंद्र सरकारने ठाकरेंच्या सरकारला दिली होती. 600 कोटी रुपये फंडात जमाही झाले, पण उद्धव ठाकरेंच्या तत्कालीन सरकारला एक पैसादेखील खर्च करता आला नाही. 600 कोटी लोकांनी दिले असताना, लोकांचा करोनाने मृत्यू होत असताना एक पैसादेखील खर्च करता न आलेल्यांनी किती शहाणपण शिकवावे हे त्यांनीच ठरवावे,” अशी जळजळीत चपराक फडणवीस यांनी लगावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0