Dadar Kabutar khana: दादरचा प्रसिद्ध कबूतरखाना वादाच्या भोवऱ्यात; प्राणीप्रेमी, जैन समाज आक्रमक

Dadar Kabutar khana: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबूतरखाना बंद, पण कबूतरांना हुसकावण्यासाठी कर्मचारी कामाला
मुंबई :- दादर पश्चिम येथील प्रसिद्ध कबूतरखान्याचा वाद आता चांगलाच पेटला आहे. Dadar Kabutar khana उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा कबूतरखाना बंद करण्यात आला असला, तरी कबूतरांना हुसकावण्यासाठी आता महापालिकेचे कर्मचारी हातात काठ्या आणि फडकी घेऊन कामाला लागले आहेत. यामुळे प्राणीप्रेमी आणि जैन समाजात तीव्र नाराजी पसरली असून, आगामी काळात याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
कबूतरांना हुसकावण्याचे काम सुरू
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबूतरखाना बंद करण्यात आला. मात्र, ताडपत्री लावलेली असतानाही मोठ्या संख्येने कबुतरे तिथे येत असल्याने आज सकाळपासून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही कबुतरे पळवण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी कबूतरांना खाद्य दिल्यास कठोर कारवाईचा इशारा देणारे फलकही महापालिकेने लावले आहेत. यामुळे कबूतरांना खाद्य देणाऱ्यांवर कारवाईची तलवार लटकत आहे.
मोकळ्या जागांची मागणी
या गंभीर स्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून वांद्रे-कुर्ला संकुल, रेसकोर्स, आरे कॉलनी किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या मोकळ्या जागांचा कबूतरांना खाद्य देण्यासाठी तात्पुरता वापर करण्याची मागणी केली आहे. लोढा यांच्या या मागणीमुळे महापालिका नेमका काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरोग्याचा मुद्दा विरुद्ध प्राणीप्रेम
कबूतरखान्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे अनेक वर्षांपासून सांगितले जात होते. श्वसनाचे विकार आणि इतर आजार वाढल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने कारवाई सुरू केली. मात्र, यामुळे प्राणीप्रेमी आणि जैन समाज नाराज झाला आहे. धार्मिक आणि सामाजिक कारणांमुळे अनेक लोक कबूतरांना दाणे घालतात. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईला त्यांचा विरोध आहे.



