Mumbai Bomb Threat : अंधेरीतील हॉटेलला ‘मुंबई उडवण्याची’ धमकी; पोलिसांची यंत्रणा सतर्क

Mumbai Bomb Threat Call : अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्येही बॉम्ब असल्याचा केला दावा; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
मुंबई: अंधेरी पूर्व येथील एका हॉटेलला बुधवारी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून “मुंबई को उडा देंगे” अशी धमकी दिली. यासोबतच हॉटेलमध्येही बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आला. या गंभीर प्रकारामुळे मुंबई पोलिसांची संपूर्ण यंत्रणा तात्काळ सतर्क झाली असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. Mumbai Latest Crime News
अंधेरीतील ‘आरिका हॉटेल’चे उप सुरक्षा अधिकारी अपूर्व पारेख यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. हॉटेलच्या लँडलाईनवर आलेल्या या दूरध्वनीमुळे मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला तात्काळ सतर्क करण्यात आले. त्यानुसार स्थानिक सहार पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हॉटेलची कसून तपासणी केली आणि परिसरात सुरक्षा वाढवली.
पोलिसांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या अफवा
धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल नंबर पोलिसांना मिळाला असून, त्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना अशाप्रकारचे 300 हून अधिक फेक कॉल्स आणि संदेश प्राप्त झाले आहेत. यामुळे पोलिसांसाठी ही डोकेदुखी ठरली आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करता येत नाही, त्यामुळे प्रत्येक धमकीची गंभीर दखल घेऊन तपास करावा लागतो, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांचे मनुष्यबळ आणि वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होतो. सध्या अशा प्रकरणांसाठी कठोर कायदा नसल्यामुळे आरोपींना सहज जामीन मिळतो. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


