
Disha Salian Death Case: राऊत-पवारांचा भाजपवर हल्ला; ‘खोटारडे आरोप, आता माफी मागा’
मुंबई | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी आणि निर्णायक घडामोड समोर आली आहे. Disha Salian Death Case या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन असून, त्यास कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचे मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिशाच्या मृत्यूबाबत भाजप आमदार नितेश राणे आणि तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार व खून झाल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत स्पष्ट केलं की, तिच्या शरीरावर कोणताही लैंगिक अथवा शारीरिक अत्याचार झाल्याचे पुरावे नाहीत. तिचा मृत्यू डोक्याला लागलेल्या जबर मारामुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे. शिवाय, या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोणतेही थेट पुरावे नाहीत, असं पोलिसांनी नमूद केलं.
या अहवालावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, “नितेश राणे व फडणवीस यांनी आता नाक घासून माफी मागावी. खोटे आरोप करून जनतेला व भ्रमित केलं गेलं.” दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांवर आरोप करत म्हटलं की, “हे सर्व खोटे आरोप निवडणुकीच्या राजकारणासाठी होते. आता सरकारने अशा खोटारड्या आरोपांवर कारवाई करावी.”
दरम्यान, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, “पोलिसांकडून पुराव्यांच्या आधारेच तपास केला जातो. या प्रकरणात पोलिसांनी न्यायाधिष्ठित भूमिका घेतल्यामुळे विरोधकांची दिशाभूल करणारी वक्तव्यं आता थांबतील.”


