Maharashtra DGP : सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे ‘पोलीस महासंचालक’! – कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याची निवड; रश्मी शुक्लानंतर स्वीकारणार सूत्रे

Sadanand Date set to be named as new DGP of Maharashtra : 26/11 च्या हल्ल्यात अतिरेक्यांच्या गोळ्या झेलल्या; यूपीएससीच्या यादीत अग्रस्थानी, डिसेंबर 2026 पर्यंत राहणार पदावर
मुंबई :- वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते Maharashtra DGP Sadanand Date यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (DGP) पदी निवड झाली आहे. राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर दाते हे त्यांची जागा घेतील. ते डिसेंबर 2026 पर्यंत या पदावर कार्यरत राहतील.
राज्याच्या गृह खात्याने पोलीस महासंचालक पदासाठी 7 उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) पाठवली होती, ज्यात दाते यांचे नाव अग्रस्थानी होते. अपेक्षेनुसार सदानंद दाते यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
सदानंद दाते यांची ओळख
1990 बॅचचे अधिकारी असलेले दाते हे कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात.त्यांनी यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखा, सायबर गुन्हेगारी, रेल्वे पोलीस आणि नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.सध्या ते राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ब्लॅक कॅट कमांडोंनी अनेक यशस्वी मोहिमा राबवल्या आहेत.
26/11 हल्ल्यातील धाडसी भूमिका
सदानंद दाते यांची सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील त्यांची भूमिका.त्यावेळी ते मुंबई क्राईम ब्रेन्चमध्ये कार्यरत होते. मुंबईच्या कामा रुग्णालयात दोन अतिरेकी घुसले असता, दाते यांनी मोजक्या पोलिसांच्या मदतीने त्यांचा धाडसाने सामना केला.त्यांच्या सतर्कतेमुळेच कामा रुग्णालयातील ओलिसांना सुरक्षितपणे पळून जाता आले. या कारवाईत दाते यांना अतिरेक्यांच्या दोन गोळ्याही लागल्या होत्या.
अशा धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यावर आता संपूर्ण महाराष्ट्राच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


