Satara News : शाळकरी मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न; जमावाने तरुणास पकडून चोप दिला

Satara Viral Crime Video : एकतर्फी प्रेमातून सातत्याने त्रास; धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न फसला
सातारा :- सातारा शहरात सोमवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे वेळेवर हस्तक्षेप होऊन मुलीचा जीव वाचला. यानंतर संतप्त जमावाने संबंधित तरुणास चांगलाच चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. Satara Latest News
ताब्यात घेतलेला तरुण गेल्या काही दिवसांपासून संबंधित अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता. सोमवारी सायंकाळीही शाळेतून घरी जात असताना त्याने तिला अडवून त्रास देण्याचा प्रयत्न केला. विरोध करताच त्याने जवळील धारदार हत्यार काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
घाबरलेली मुलगी आरडाओरडा करू लागल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. काही तरुणांनी धाडसाने पुढे येत त्याला गोंधळात पकडले. त्यानंतर जमावाने संतापून त्यास चोप दिला. Satara Police Station पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्याला ताब्यात घेतले.
या प्रकारामुळे संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.



