Jitendra Awhad Threatening Message : “विधानसभेच्या दरम्यान आव्हाडांना धमकीचा मेसेज; पडळकर समर्थकांचा हात?”

•अमर कोळी नावाचा युवक, पाडळकरसोबतचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई | राज्यातील पावसाळी अधिवेशनात वादळ निर्माण करणारी घटना बुधवारी घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभा सुरू असतानाच धमकीचा मेसेज आल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावर केला. हा मेसेज गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने पाठवला असल्याचा गंभीर आरोपही आव्हाडांनी केला आहे.
आव्हाड यांनी संबंधित मोबाईल क्रमांकासह धमकीचा मजकूर जाहीर करत, “हा मेसेज अमर कोळी नावाच्या व्यक्तीने पाठवला आहे. आणि त्याचा फोटो भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबतचा आहे,” अशी माहिती दिली. त्याचबरोबर, “आता या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री काय कारवाई करतात?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर पडळकर आणि आव्हाड यांच्यातील जुना वादही पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुधवारी विधानभवन गेटवर या दोघांमध्ये वाद झाला. “पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा मला लागला, त्यानंतर त्यांनी मुद्दाम त्रास दिला,” असा आरोप आव्हाडांनी केला. शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची स्थिती निर्माण झाल्यानं हा वाद चांगलाच पेटला होता.
गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये तणावाचं वातावरण होतं. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी विधानभवन गेटजवळच “मंगळसूत्र चोर” असा उल्लेख करत पडळकरांवर टीका केली होती. त्यामुळे आता ही धमकी कोणत्या हेतूनं देण्यात आली? हे समजून घेणं आणि कारवाई होणं महत्त्वाचं ठरणार आहे.



