मुंबई

Mumbai Crime News : फेसबुकवरील खेळ जीवावर बेतला, 79 वर्षीय वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

•‘1 कोटींचे बक्षीस’ लागल्याचे आमिष, सायबर ठगांनी वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळले; उत्तर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई :- फेसबुकवर एक साधा खेळ खेळणे एका 79 वर्षीय वृद्धेला चांगलेच महागात पडले आहे. ‘1 कोटींचे बक्षीस लागले आहे’ असे आमिष दाखवून सायबर ठगांनी तिच्याकडून तब्बल 21 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी उत्तर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेगाव येथील मूळ रहिवासी असलेली ही वृद्ध महिला सध्या कांदिवलीच्या चारकोप येथे राहत आहे. एप्रिल २०२५ मध्ये त्या फेसबुक वापरत असताना त्यांना एका खेळाची जाहिरात दिसली. गंमत म्हणून त्यांनी त्यातील प्रश्नांची उत्तरे दिली, जी अचूक ठरली. त्यानंतर ‘हेडगे फंड मॅनेजर’ नावाच्या कंपनीतून त्यांना फोन आला. तुम्हाला 100 दशलक्ष (1 कोटी) रुपयांचे बक्षीस लागले असल्याचे सांगण्यात आले.

या वृद्धेचा मुलगा पुनर्वसन केंद्रात उपचार घेत असल्यामुळे त्यांना पैशांची तातडीची गरज होती. त्यामुळे, 1 कोटी रुपये मिळणार असल्याचे ऐकून त्यांना आनंद झाला. ठगांनी त्यांना एक लिंक पाठवून ‘प्रक्रिया शुल्क’ (प्रोसेसिंग फी) म्हणून 75 हजार रुपये भरण्यास सांगितले. ऑनलाइन व्यवहारांची माहिती नसल्याने वृद्धेने ओळखीतून पैसे उसने घेऊन ठगांनी दिलेल्या बँक खात्यात भरले.

28 एप्रिल ते 21 जून या काळात 1 कोटी मिळतील या आशेवर त्यांनी थोडे थोडे करून एकूण 21 लाख 23 हजार 700 रुपये खात्यात भरले. तरीही ठग आणखी पैशांची मागणी करत होते. अखेर त्यांच्या एका मैत्रिणीला यावर संशय आला आणि तिने हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे सांगितले. जेव्हा वृद्धेने पुन्हा फोन केला, तेव्हा ठगांनी तिचे ॲप बंद झाल्याचे सांगून पुढील पैसे मिळणार नाहीत असे स्पष्ट केले.

या गंभीर प्रकारामुळे वृद्ध महिलेचे घरात साठवलेले आणि उसने घेतलेले असे एकूण 21 लाख रुपये वाया गेले. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0