
Uddhav And Raj Thackeray : मनसे नेते बाळा नांदगावकर भावूक; ‘ठाकरे प्रेमींसाठी हा परमानंद’
मुंबई :- गणेश चतुर्थीच्या Ganpati Ustav शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी सहकुटुंब मनसेप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. या भेटीमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ठाकरे बंधूंमधील मनोमीलनाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
गेल्या काही महिन्यांत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. हिंदी भाषेच्या निर्णयावरून एकत्र मेळावा, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरेंनी ‘मातोश्री’ला दिलेली भेट आणि आता गणेश चतुर्थीला उद्धव ठाकरेंनी ‘शिवतीर्थ’ला दिलेली भेट, या सर्व घटनांमुळे आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी चिन्हे दिसत आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बाळा नांदगावकर यांची भावूक प्रतिक्रिया
ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, “गणेश चतुर्थी निमित्त सालाबादप्रमाणे राज ठाकरे यांच्याकडे गणपती बाप्पा विराजमान झाले. परंतु या वर्षी या उत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला कारण आज अनेक वर्षानंतर उद्धव साहेब हे सहपरिवार बाप्पाच्या दर्शनाला आले.”
“राजकारण होत राहील, पण ठाकरे कुटुंब एकत्र येणे हे माझ्यासारख्या असंख्य ठाकरे प्रेमींना अतिशय आनंद देणारे आहे. याबद्दल मनात एकच येते की खरंच बाप्पा पावला,” असे म्हणत नांदगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, मनसे नेते राजू पाटील यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी “आज ओरिजिनल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राजसाहेबांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं,” असे म्हणत सूचक टोला लगावला आहे.


