Red Alert In Mumbai : मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा ‘रेड अलर्ट’ ; नागरिकांची तारांबळ

• दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाल्याने पावसाचा जोर वाढणार; गरज असेल तरच घराबाहेर पडावे, हवामान विभागाचे आवाहन
मुंबई :- मुंबईसह संपूर्ण राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मोसमी पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार, आज मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर आणि उपनगरात ‘जलमय’ स्थिती
रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई शहरासह उपनगरात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नोकरदार वर्गाची मोठी तारांबळ उडाली. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली होती, ज्यामुळे अनेकांना कार्यालयात पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी पालकांचीही धावपळ उडाली. कुर्ला, सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता, अंधेरी आणि परळसारख्या भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती
मुंबईप्रमाणेच आज रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव आणि पनवेल तालुक्यांत पावसाचा जोर सर्वाधिक आहे.
दोन कमी दाब क्षेत्र पावसासाठी पोषक
सध्या राज्यात पाऊस वाढण्यासाठी दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. एक नवीन कमी दाब क्षेत्र उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावर तयार झाले आहे, जे मंगळवारी जमिनीवर येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, विदर्भ आणि परिसरात आणखी एक कमी दाब क्षेत्र सक्रिय झाल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. ही दोन्ही प्रणाली राज्यात पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी पोषक ठरणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.


