Mumbai Crime News : घुसखोरीचा शेवट… मुंबईत दोन बांगलादेशी महिलांना शिक्षा!

घाटकोपरमधून अटक; फास्ट ट्रॅक कोर्टाचा कठोर निर्णय,भारतामध्ये अनधिकृत प्रवेश आणि बेकायदेशीर वास्तव्य ठरलं महागात!
मुंबई | घाटकोपरमधील रेल्वेलाइनजवळील वैतागवाडी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत मुंबई गुन्हे शाखेने दोन बेकायदेशीर बांगलादेशी महिला नागरिकांना अटक करून मोठी कारवाई केली. बनावट भारतीय नाव घेऊन मुंबईत बिनधास्त राहत असलेल्या या महिलांचा परकीय नागरिक कायद्यान्वये दोष सिध्द झाला असून, न्यायालयाने त्यांना 5 महिन्यांची साधी कैद आणि प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गुन्हे प्रकटीकरण कक्ष-4 ने 2 जानेवारी 2025 रोजी छापा टाकला. यामध्ये अटक करण्यात आलेल्या महिला म्हणजे –
➤ चांदनी अफजल मजी (भारतीय नाव – चांदनी ओप्पू मौडल, वय 24)
➤ तरिलमा मुजम्मील मोडोल (भारतीय नाव – तस्लिमा रफिकूल मौडल, वय 41) या दोघीही कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय बांगलादेशातून भारतात घुसल्या होत्या आणि अनेक महिने बेकायदेशीर वास्तव्य करत होत्या.
तांत्रिक तपासातून त्या बांगलादेशातील नातेवाईकांशी थेट संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा सिद्ध होताच 3 जून 2025 रोजी किल्ला कोर्टातील अतिरीक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी या दोघींना शिक्षा सुनावली.
ही कारवाई म्हणजे परदेशी नागरिकांना कायद्यातून सूट नाही, हे ठामपणे दाखवणारा इशाराच मानला जात आहे. गुन्हे शाखेच्या पथकाच्या दक्षतेमुळे देशविरोधी आणि बेकायदेशीर नेटवर्कवर मोठा लगाम बसला आहे.
पोलीस आयुक्त बृहन्मुंबई देवेन्द्र भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि मध्य) सुनिल चंद्रामोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिसे, महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी कोतवाल व इतर अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई पार पाडली.


