ठाणेमुंबई
Trending

Anil Parab : गुंड नीलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची हकालपट्टी करा – अनिल परब

Anil Parab On Yogesh Kadam : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांची मागणी; म्हणाले, ‘मंत्र्यांनी पोलिसांचा अहवाल डावलून गुंडांना पोसले’

मुंबई :- पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलिसांचा Pune Police नकारात्मक अहवाल डावलून शस्त्र परवाना (Arms License) मंजूर केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब Anil Parab यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम Yogesh Kadam यांच्या पदावरून तातडीने हकालपट्टीची मागणी केली आहे. सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावरून गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रान उठवत योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली.

अनिल परब यांनी योगेश कदमांनी नियम कसे डावलले याची क्रोनोलॉजी उलगडून सांगितली. सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळचा सख्खा भाऊ आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 20 जानेवारी 2025 रोजी सचिन घायवळचा शस्त्र परवाना अर्ज फेटाळला होता.

यावर सचिन घायवळ याने गृह खात्याकडे अपील दाखल केले. पोलिसांना आपली बाजू मांडून सचिन घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी योगेश कदम यांना सांगितली होती. मात्र, योगेश कदम यांनी याकडे दुर्लक्ष करत, ‘सचिन घायवळ बांधकाम व्यावसायिक आहेत, ते 20 वर्षे शाळेत क्रीडा शिक्षक होते, त्यांना व्यवसायात स्पर्धक आहेत आणि मोठ्या रक्कमेची देवाणघेवाण करावी लागते, त्यामुळे जीवाला धोका आहे’, हे कारण देत सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर करण्याचे आदेश दिले.

अनिल परब यांनी या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “पोलीस सचिन घायवळ याच्यासारख्या गुंडांना शस्त्र परवाना मिळू नये यासाठी प्रयत्न करतात, मात्र योगेश कदम यांनी पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला सारुन सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला. या गोष्टीमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होते.”

यावेळी त्यांनी सरकारमधील मंत्र्यांवर थेट आरोप केले. “हे मंत्री गुंडांना अधिकृत शस्त्र परवाना देत आहेत आणि दररोज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय अडचण आहे की, ते अशा मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून का बसले आहेत?” असा थेट सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0