Pradnya Satav : काँग्रेसला खिंडार! आमदार प्रज्ञा सातव यांचा राजीनामा; आजच भाजपमध्ये प्रवेश

•गांधी घराण्याशी असलेले दशकांचे नाते संपुष्टात; अंतर्गत गटबाजीला कंटाळून प्रज्ञा सातवांचा ‘हात’ सोडण्याचा निर्णय
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचे दिवंगत दिग्गज नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आज (18 डिसेंबर) सकाळी त्यांनी विधीमंडळ सचिवांकडे आपले राजीनामा पत्र सुपूर्द केले. यामुळे काँग्रेसचा हिंगोलीतील बालेकिल्ला ढासळला असून, प्रज्ञा सातव यांचा आजच भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
हिंगोलीतून समर्थकांचे शक्तिप्रदर्शन
प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्याची बातमी पसरताच हिंगोलीतून मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ‘राजीव सातव अमर रहे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आपल्या लाडक्या नेत्याच्या पत्नीने घेतलेल्या या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून, हिंगोलीतील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलणार असल्याचे चिन्हे आहेत.
राजीनाम्यामागे ‘गटबाजी’चे ग्रहण?
राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. मात्र, गेल्या काही काळापासून हिंगोली काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने टोक गाठले होते. सातव गट आणि स्थानिक इतर नेत्यांमधील संघर्षामुळे प्रज्ञा सातव अस्वस्थ होत्या. वारंवार तक्रार करूनही पक्षश्रेष्ठींकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने अखेर त्यांनी भाजपचा मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे. तसेच, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनीच सातव यांना भाजपमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राजीव सातव: राहुल गांधींचा ‘खास’ शिलेदार राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जात होते. 2014 च्या मोदी लाटेतही त्यांनी हिंगोलीतून विजय मिळवला होता. गांधी घराण्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध होते. अशा थोर नेत्याच्या पत्नीनेच आता पक्ष सोडल्यामुळे काँग्रेससाठी हा केवळ राजकीय नव्हे, तर नैतिक धक्का देखील मानला जात आहे.
कोण आहेत प्रज्ञा सातव?
शिक्षण: डॉ. प्रज्ञा सातव या पेशाने डॉक्टर (MBBS) आहेत.
राजकीय पदे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार.
कार्यकाळ: 2024 मध्ये त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या होत्या, त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत होता. मात्र, कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.
सतेज पाटलांकडून चर्चा फेटाळण्याचा प्रयत्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी कालपर्यंत या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले होते. “सातव कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहे, त्या पक्ष सोडणार नाहीत,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, आज प्रत्यक्ष राजीनामा दिल्याने काँग्रेसच्या सर्व दाव्यांची हवा निघाली आहे.


